आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi Disappoint To 40 Percent Children Have Mulnutriant

देशात अजूनही 40 टक्के मुले कुपोषणग्रस्त असल्याची खंत- सोनिया गांधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालघर (जि. ठाणे) - ‘स्त्रियांचे आरोग्य सुधारले की त्यांच्या मुलांचेही आरोग्य सुधारेल आणि या मुलांमुळेच उद्याचा भारत घडेल,’ असा आशावाद कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी व्यक्त केला. महिलांच्या सामाजिक स्तरात बदल झाला नाही, तर केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणा-या योजनांचा त्यांना फायदा होणार नाही, हे सांगतानाच देशात अजूनही 40 टक्के मुले कुपोषणग्रस्त असल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.

शून्य ते 18 वयोगटातील मुलांसाठी राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी पालघर येथे सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महिलांचा सर्वांगिण विकास आणि सक्षमीकरण करण्याचा उद्देश समोर ठेवून त्यांचे आरोग्य कौटुंबिक समस्या, रोजगार अशा विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सरकारने राबवलेल्या तसेच प्रस्तावित असलेल्या योजनांची माहिती सोनियांनी दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्राने अध्यादेश काढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही त्यांना 50 टक्के आरक्षण देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

कुपोषण ही प्रमुख समस्या
सोनिया म्हणाल्या की, गेल्या काही वर्षात पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यात देशाला यश आले आहे. तसेच कोणतेही मूल शिक्षणाशिवाय वंचित राहू नये म्हणून शिक्षण हक्क कायदा बनवण्यात आला. देशातल्या 12 कोटी मुलांसाठी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली. बाल अधिकार संरक्षण आयोग आणि मुलांचे लैंगिक शोषणाविरोधात कायदा बनवून त्यांना सुरक्षा देण्याचे काम सरकारने केले. मात्र अद्यापही काही आव्हाने बाकी असून त्यातील कुपोषण ही एक प्रमुख समस्या आहे. मात्र यूपीए सरकारने प्रस्तावित केलेल्या अन्न सुरक्षा विधेयकामुळे मुलांच्या पोषणामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘आशा’चे मानधन थेट खात्यात
या वेळी सोनियांच्या हस्ते अंजली बोंड या ‘आशा’ कार्यकर्तीचे मानधन आधार कार्डच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. देशात नऊ लाख आशा कार्यकर्त्या असून सरकारच्या विविध आरोग्य योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, उपचारामध्ये मदत करणे अशी कामे त्या घरोघरी जाऊन करतात.
सोनिया गांधी भारावल्या
कार्यक्रमास उपस्थित मुलांशी सोनिया गांधी यांनी संवाद साधला. या शालेय मुला- मुलींमधील कलागुण पाहून आपण भारावून गेल्याचे त्यांनी भाषणात सांगितले. ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने मुलांवर उपचार केले जातात याचीही माहिती त्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देण्यात आली.
वसंतला मिळाले गिफ्ट
पालघरचा 17 वर्षीय विद्यार्थी वसंत रावते याचे स्वप्नच जणू आज प्रत्यक्षात उतरले... वसंतला एक हात नाही, एक पाय आणि दुसरा हात आखूड आहे; पण तरीही तो उत्तम कॅसिओ वाजवतो. त्याच्या कलेचा गौरव करत सोनिया गांधी यांनी त्याला एक नवा कोरा कॅसिओ भेट दिला. त्यावर वसंतने त्यांना ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गाणेही वाजवून दाखवले. वसंत पायाने उत्तम चित्रे काढतो. त्याच्या चित्रांचे प्रदर्शनही ठेवण्यात आले होते. त्याला मिळालेल्या अनपेक्षित भेटवस्तूचे कौतुक त्याचे मित्रमैत्रिणी करत होते.
मानसीला आधार
सहा वर्षांच्या गुलशनलाही आज खूप आनंद झाला होता, कारण त्याला सोनियांनी व्हीलचेअर भेट दिली, तर मानसी किणीला ऐकण्याचे मशीन... वसईच्या प्रतीक सेवा मंडळ संचालित कर्णबधिर विद्यालयामध्ये शिकणा-या मानसीला वेळेवर उपचार न मिळाल्याने 13 व्या वर्षीही नीट बोलता येत नाही. आता चांगल्या प्रतीचे मशीन दिल्याने कदाचित तिच्या बोलण्यामध्ये फरक पडेल, अशी आशा तिच्या शिक्षिका देवकी मराठे यांनी व्यक्त केली.
सब कुछ बच्चेकंपनी
आजच्या कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून बहुसंख्य विद्यार्थीच उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन शालेय विद्यार्थ्यांनीच केले. त्यामुळे राजकीय कार्यक्रमांमध्ये नेहमीचा होणारा गोंधळ दिसला नाही. एकलव्य रेसिडेन्सी स्कूलच्या सागर टोपले आणि प्रणिता दुमडा यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. या दोघांनीही पहिल्यांदाच सूत्रसंचालन केले. याआधी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तीनच दिवसांपूर्वी सूत्रसंचालनासाठी सांगण्यात आले, तेव्हापासून रोज सराव केल्याचे सागरने सांगितले.
खूप खूप मजा आली
सोनिया गांधी एवढ्या मोठ्या नेत्या आहेत आणि त्यांना आपण आतापर्यंत केवळ टीव्हीवरच पाहिले होते; पण आज प्रत्यक्षात त्यांच्याशी थेट बोलण्याची आम्हाला संधी मिळाली. त्यांचे स्वागत करताना खूप खूप मजा आल्याचे प्रणिता म्हणाली. या कार्यक्रमात मुलांनी विविध सामाजिक संदेश घेऊन नाट्य व नृत्ये सादर केली. आदिवासींचे तारफा नृत्य, देशभक्तीपर गीत, अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे नाटुकलेही करण्यात आले.
बालमृत्यूबाबत चिंता :आझाद
केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी देशातील बालमृत्यू दराबद्दल चिंता व्यक्त केली. 2.70 कोटी मुले दरवर्षी जन्माला येतात; पण त्यापैकी केवळ 2.6 कोटीच जगतात. हा मृत्युदर कमी करण्याची गरज आहे, असे सांगून या कार्यक्रमामुळे 22 कोटी मुलांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही जव्हार, मोखाडा आणि मेळघाटच्या कुपोषणाबद्दल चर्चा होत असल्याचे सांगितले. मात्र, युनिसेफने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणामध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे, असा दावाही त्यांनी केला.
निधी कमी पडू देणार नाही
राष्‍ट्री य बाल आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत वर्षातून दोन वेळा या मुलांच्या आरोग्याची तपासणी होणार असून त्यांच्यावर उपचारही करण्यात येणार आहेत. या योजनेबद्दल सोनिया गांधी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच देशातल्या गरजू आणि मागास भागातल्या मुलांना या योजनेचा लाभ व्हावा, या उद्देशाने पालघर या आदिवासीबहुल भागातून कार्यक्रमाची सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या योजनेसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.