आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी दोन मृतदेहांचा शोध, महाडमध्ये मृतांची संख्या 26; 16 अद्याप बेपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाड/मुंबई - सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल काेसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचे शाेधकार्य पाचव्या दिवशीही अविरत सुरु हाेते. शनिवारपर्यंत २४ मृतदेह शाेधण्यात यश अाले हाेतेे, तर रविवारी सायंकाळपर्यंत अाणखी दाेन मृतदेहांचा शाेध लावण्यात ‘एनडीअारएफ’चे जवान यशस्वी ठरले. या दुर्घटनेत ४२ प्रवासी बेपत्ता झाल्याचा प्राथमिक अंदाज असून अाजपर्यंत त्यापैकी केवळ २६ मृतदेहच सापडले अाहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पुन्हा एकदा महाड येथील दुर्घटना स्थळाला भेट दिली. शोध मदत कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अाढावा घेतानाच शिंदेंनी त्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. त्यांच्या समवेत स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले होते. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनीही भेट देऊन अाढावा घेतला. शनिवारी संध्याकाळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही घटनास्थळी भेट देऊन अाढावा घेतला हाेता.
, तसेच मृतांच्या नातलगांचे सांत्वनही केले. जाेपर्यंत बेपत्ता वाहने प्रवाशांचा शाेध लागत नाही ताेपर्यंत शाेधकार्य सुरूच राहिल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात अाले.सावित्री पूल दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी अखेर एसटीचे तसेच इतर वाहनांचे अवशेष शोधण्यात नौदलाला यश मिळाले. शनिवारी 2 मृतदेह सापडले असून यापैकी एक तवेरा गाडीमधून प्रवास करणाऱ्या दिनेश कांबळीचा आहे. दुसऱ्या मृतदेहाची ओळख मात्र पटलेली नाही. रविवारी सकाळी आणखी दोन मृतदेह सापडले आहेत. त्‍यामुळे मृतांची संख्या आता 27 झाली असून 41 बेपत्ता व्यक्तीपैकी अजूनही 16 जणांचा शोध लागलेला नाही. नौदलाच्या पथकाबरोबरच पाणबुडे तसेच अत्याधुनिक कॅमेराचा वापर या मोहिमेत केला जात आहे.

जोरदार पाऊस, नदीचा प्रचंड वेग यामुळे मृतदेह १२० कि .मी. अंतरापर्यंत वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हाप्रळच्या खाडीत कांबळीचा मृतदेह आढळला. शनिवारी अत्याधुनिक अंडरवाॅटर कॅमेराच्या साहाय्याने वाहनांची शोध घेण्याची मोहीम नव्याने सुरू करण्यात आली. हे कॅमेरे ७०० फुट खोल तसेच ४०० फुट रूंद भागाचा शोध घेऊ शकतात. एसटीचा तसेच इतर वाहनांचा शोध लागत नसल्याने शोध यंत्रणेवर दबाव वाढत असताना चौथ्या दिवशी सावित्री पूलापासून ३ कि .मी. अंतरावर नौदलाला एसटी तसेच इतर वाहनांचे काही अवशेष मिळाले.
सावित्री पुलावरून वाहून गेलेल्या दोन्ही एसटी बसेस पुलापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या दादली पुलापर्यंतच्या भागातच असाव्यात, असा शोध पथकांचा अंदाज आहे. त्यामुळे तटरक्षक दल आणि एनडीआरएफ ने वाहनाचा शोध घेण्याची मोहीम याच तीन किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये केंद्रित केली आहे. त्यांच्या दिमतीला तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर सहभागी आहे.

या भागात नदीचे पात्र खोल आहे. येथेच एसटी बसचा एक फायबरचा तुकडा आणि तवेराच्या कॅरियरचे स्टँड आढळून आले. त्यामुळे वाहने याच भागात खोलवर सांगाड्यांच्या स्वरूपात असावीत आणि अद्यापही या वाहनांमध्ये काही मृतदेह अडकून पडले असावेत, असा पथकांचा अंदाज आहे. चौथ्या दिवसानंरही नदीपात्रातून वाहून जाणारे मृतदेह स्थानिक ग्रामस्थ आणि वाळू व्यावसायिकांना आढळले.
तरंग लहरींवर काम करणारे उपकरण आणले
सावित्री नदीत बुडालेल्या वाहनांचा शोध घेण्यासाठी तरंग लहरींवर काम करणारे अत्याधुनिक उपकरण आणण्यात आले आहे. त्याच्या मदतीने पाण्याखाली सुमारे 700 मीटर पर्यंतची वस्तू शोधणे शक्य होणार आहे. त्यामुळे शोध मोहिमेला गती मिळणार नाही. अमेरिकन बनावटीचे हे उपकरण आहे. केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी घटनेची आणि राबविण्यात येणाऱ्या शोध मोहिमेची माहिती घेतली.
महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेची जबाबदारी सरकारची : गडकरी
सरकार म्हणून महाड येथील सावित्री पूल दुर्घटनेची सर्वस्वी जबाबदारी आमची आहे, अशा शब्दांत जबाबदारी स्वीकारताना ६ महिन्यांत २८ कोटी रुपये खर्च करून सावित्री नदीवर नवीन पूल बांधण्यात येईल, अशी घोषणाही केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली. केंद्र सरकारने हा पूल खचल्याची जबाबदारी स्वीकारल्याने राज्य सरकारने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. सावित्री नदीवरील पूल हा गडकरी यांच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाची देखरेख केली जाते. मात्र, पुलाचे नियंत्रण आणि देखरेख, डागडुजी करण्याची , त्यासाठी निधी देण्याची जबाबदारी केंद्र सरकारचीच असते. या पार्श्वभूमीवर जबाबदारी कोणी घ्यायची असा वाद सुरू असताना शेवटी केंद्राने ही जबाबदारी स्वीकारली.
गडकरी म्हणाले, मुंबई-गाेवा महामार्गाचे चौपदरीकरण वेगात होईल. या महामार्गावर ब्रिटिशकालीन २२ पेक्षा अधिक पूल असून पनवेल ते इंदापूर या रस्त्याचे चौपदरीकरण करणे हे मोठे आव्हान आहे. हा महामार्ग पूर्ण करून जनतेचे वर्षोनुवर्षे होणारे हाल लवकरच कमी होतील, असेही त्यांनी सांगितले. जमिनीच्या संपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सावित्री पुलाच्या कामासाठी केंद्र सरकार सर्वताेपरी मदत करणार असून कामाच्या निविदा लवकरात लवकर काढून १८० दिवसांत नवा पूल उभा केला जाईल. विशेष म्हणजे हा पूल ज्या मुंबई-गोवा महामार्गावर उभा आहे त्याच्या चौपदरीकरणाला डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
या महामार्गावर जमिनीच्या संपादनाचे काम खूप अडचणीचे असले तरी आम्ही यामधून मार्ग काढला असून लोक सहकार्य करायला लागले आहेत. माझे या भागातील जनतेला आवाहन आहे की आवश्यक तेथे सहकार्य करा. तुमचे सहकार्य आणि केंद्राच्या कामाचा वेग याचा मेळ झाला तर येत्या दोन वर्षांत या महामार्गाचे चौपदरीकरण नक्की होऊ शकते, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

आघाडीच्या काळात भूसंपादन संथ
आघाडी सरकारच्या काळात भूसंपादनाची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने झाल्याने चौपदरीकरणाचे काम रखडले होते. मात्र भाजपचे सरकार येताच मी स्वत:पुढाकार घेऊन हा महामार्ग लवकर पूर्ण कसा होईल, यासाठी पुढाकार घेतला आहे. कारण मला महाराष्ट्राची माहिती आहे. या महामार्गावर वर्षाला शेकडोंनी लोकांना आपले प्राण हकनाक गमवावे लागतात, हे दिसत असल्याने वेगाने चौपदरीकरणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. यामुळे मी बैठका घेतल्या. लोकप्रतिनिधींना बोलावून लोकांकडून सहकार्य मिळवण्याची जबाबदारी तुमची आहे. मी पैसे द्यायला तयार आहे, लोकांकडून जमीन संपादन करून घेण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. यात राजकारण आणता कामा नये. अन्यथा मी निधी परत घेऊन जातो, असेही त्यांनी सांगितले.

आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणावर पडदा
पावसाळी अधिवेशनात सावित्री पुलाच्या दुर्घटनेमुळे विरोधकांनी फडणवीस सरकारला घेरले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. संसदेतही या दुर्घटनेचे पडसाद उमटले. गडकरी यांनी दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणावर अखेर पडदा टाकला.

पोस्टमार्टम न करण्याचे आदेश
आढळून येत असलेले मृतदेह पाण्यात बराच काळ राहिल्याने ते फुगलेले असून माशांनीही कुरतडेल्या स्थितीत सापडत आहेत. मृतदेहांची अत्यंत वाईट अवस्था असल्याने नातेवाईकांच्या भावना लक्षात घेऊन या मृतदेहांचे पोस्टमार्टम न करता आवश्यक नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक प्रकाश बोरुडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
अशी राबवली जात आहे शोध मोहिम
तटरक्षक दल व हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे गेले तीन दिवसांपासून अखंडितपणे शाेधकार्य सुुरू अाहे. एनडीआरएफच्या चार पथकातील १६० जवान हे नऊ बाेटी तसेच अाठ डायव्हर्सद्वारे अथक शोधकार्य करत अाहेत. तसेच याचबरोबर स्थानिक पातळीवरील ३५ पट्टीचे पोहणारे नागरिक, ५ राफ्टरर्स, ६ केकेज् टीम, स्थानिक मच्छीमारांचीही बचावकार्यात मदत हाेत अाहे. स्थानिक ३०० पाेलिस व अधिकाऱ्यांचा ताफा व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली सहा डॉक्टरांचे पथक १२ रुग्णवाहिकेसह या भागात कार्यरत आहे.
आतापर्यंत सापडले 27 मृतदेह
पहिल्या दिवशी बुधवारी दाेन तर गुरुवारी 12 मृतदेह सापडले हाेते. शुक्रवारी अाणखी दहा मृतदेह सापडले. आतापर्यंत एकुण 27 मृतदेह सापडले असून त्यापैकी 21 जणांची अाेळख पटली अाहे. तर गंगाखेड तालुक्यातील बसचालक गाेरखनाथ मुंडे यांच्यासह किमान 16 प्रवासी अजून बेपत्ता अाहेत. सावित्री नदीपात्रात ३० किलाेमीटर्सच्या परिसरात त्यांचे शोधकार्य सुरू आहे. मृतदेह पाण्याच्या प्रवाहासाेबत दूरवर वाहून गेल्याचे एनडीआरएफ व अन्य शोधपथकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यात महाड परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढला असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत.
३०० किलो चुंबकाने वाहनांचा शोध सुरू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, बेपत्ता बस व वाहनांचा ३०० किलो वजनाचे चुंबकाचा वापर करून शोध सुरू आहे.
मुदत संपली तरी बॅरिअर बांधून सुरू हाेती पुलावरून वाहतूक !
मंगळवारी मध्यरात्री महाडजवळील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातामागचे वास्तव समोर आले आहे. महाड, पाेलादपूर तालुक्यांना जोडणारा नडगाव-राजेवाडी दरम्यानचा हा ब्रिटिशकालीन पूल अखेरच्या घटका मोजत हाेता. िवशेष म्हणजे या पुलाची मुदत संपल्याचे पत्र ब्रिटिनमधील पूल उभारणाऱ्या यंत्रणेने सरकारला पाठवलेली हाेते. मात्र तरीही राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे साफ दुर्लक्ष करून गोव्यावरून मुंबईकडे येणारी एकेरी वाहतूक सुरू ठेवली. त्याचीच परिणिती या भीषण दुर्घटनेत झाल्याचे समाेर अाले अाहे.
१९२८ मध्ये बांधकाम
सावित्री नदीवर दोनपैकी एक पूल ब्रिटिशकाळात १९२८ मध्ये बांधण्यात आला. याची लांबी १५४.७० मी. व रुंदी ११.१० मी. होती. याच्या समांतर नवा पूल १९९९-२००० मध्ये झाला. नव्या पुलाची लांबी १८४ मीटर व रुंदी ९.१० मीटर आहे.
अरबी समुद्रापासून अवघे 18 किमी अंतर
दुर्घटनाग्रस्त पूल अरबी समुद्रापासून अवघ्या 18 किमी अंतरावर आहे. तटरक्षक दलाची जहाजे, बोटी व जवान शोधकार्यात उतरले आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा...
- प्रकाश मेहतांची माफी दिलगिरी
- महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता बंद
- चालकाचा मृतदेह 130 किमीवर
- महाडच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होणार
- महाड पूल दुर्घटनेत संपूर्ण कुटूंब बेपत्ता
- जुन्या पुलांचे सेफ्टी ऑडिट करणार : मुख्यमंत्री
- बचाव कार्यात हेलिकॉप्टर व बोटींचा वापर
- अवैध वाळू उपसा भोवला
- ब्रिटिशांना जबाबदारीची जाणीव
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)