'ठाणे बंद'मुळे विद्यार्थ्यांसह / 'ठाणे बंद'मुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे त्रस्त; 'बंद म्हणजे नेते आणि बिल्डरांचे साटेलोटे'

Apr 18,2013 03:08:00 PM IST
ठाणे- अनधिकृत बांधकामावरील कारवाई विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले असून त्यांनी आज (गुरुवारी) 'ठाणे बंद' पुकारला आहे. या बंदमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे. रिक्षा, बस बंद असल्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय झाली आहे. ज्ञानसाधना महाविद्यालय प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विद्यापीठाच्या परीक्षा या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

'ठाणे बंद' म्हणजे राजकीय नेते आणि बिल्डरांचे साटेलोटे असल्याचा सनसनीत आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंनी केला आहे. राज यांच्या आरोपामुळे ठाण्‍यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

ठाण्यातील 'बंद' हा केवळ व्होट बँक असल्याचे सांगत अनधिकृत बांधकामे करणार्‍या बिल्डर आणि त्यांना मदत मदत करणार्‍या नगरसेवकांवर कारवाई का होत नाही, असाही सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

'बंद' हिंसक वळण:
मनसे आणि भाजप वगळता शिवसेना आणि राष्ट्रवादीने पुकारलेल्या ठाणे बंदला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड केल्यामुळे ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात प्रामुख्याने टीएमटी आणि एसटीच्या बसेसला त्यांनी लक्ष्य केले आहे. प्रवाशांना बस खाली उतरवून बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच टीएमटी बसेसमधली हवाही काढण्यात आली. शहरातील पेट्रोल पंप बंद असून रिक्षा सेवा पूर्ण पणे ठप्प आहे. किराणा दुकानेही बंद आहेत. मनसे आणि भाजपने या बंदला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहे.

दरम्यान, शिळफाट्याजवळील एक इमारत कोसळून 74 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात केली होती. या कारवाईविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन ठाणे बंद हाक दिली आहे.
अनधिकृत बांधकामाविरोधात गुरुवारी आयोजित ठाणे बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा नाही, असे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. अनधिकृत बांधकामाला राजकीय हस्तक्षेपच जबाबदार आहे. राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ठाणे महापालिका ज्यांच्या ताब्यात आहे त्या शिवसेनेने आयोजित केलेला बंद, हे राजकीय ढोंग असल्याचा आरोप ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
X