आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे पालिकेतील राड्यामुळे शिवसेना-भाजप युतीची कोंडी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे / मुंबई - ठाणे महापालिकेतील राड्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या सत्ताधारी शिवसेना भाजप युतीची कोंडी झाली आहे. भाजपचे उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी केलेल्या गद्दारीमुळे महायुतीच्या उमेदवाराचा परिवहन सभापतीपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याचा आरोप झाला. तसेच त्यांना मारहाणही झाली. त्यानंतर त्यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला असला तरी आता त्यांनी नगरसेवकपदावरूनही दूर व्हावे, अशी जोरदार मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे. मात्र पाटणकर यांचा राजीनामा घेतल्यास युती अल्पमतात जाऊ शकते, या भीतीने भाजप तसेच शिवसेनेच्या नेत्यांकडून आपल्याच नगरसेवकांच्या नाकदुर्‍या काढण्यासाठी आटापिटा सुरू झाला आहे.
ठाणे महापालिकेत युतीचे 65, तर काँग्रेस राष्ट्रवादीचेही 65 नगरसेवक असून महापौर तसेच उपमहापौरपदावरून दोघांमध्येही साठमारी सुरू आहे. सत्तेसाठी न्यायालयाचीही दारे ठोठावण्यात आली असून बहुतांशी समित्या सभापतीविना पोरक्या झाल्या आहेत. त्याचा थेट परिणाम सार्वजनिक कामांवर झाला आहे. त्यात आयुक्तांनी परिवहन सभापतीपदासाठी निवडणूक घेण्याचा आग्रह धरला. मात्र भाजपचे सदस्य अजय जोशी यांनी पक्षाचा व्हीप झुगारून बंडखोरी करत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शैलेश भगत यांना मतदान केले. परिणामी युतीचे उमेदवार प्रकाश कदम यांचा पराभव झाला. पाटणकरांनी जोशी यांना बंडखोरी करण्यास भाग पाडले, असा आरोप करत युतीच्या नगरसेवकांनी त्यांना शिव्यांची लाखोली तर वाहिलीच, पण त्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.
या प्रकरणामुळे पाटणकर यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांना एवढीच शिक्षा पुरेशी नसून त्यांची नगरसेवकपदावरूनही हकालपट्टी करायला हवी, अशी मागणी भाजपसह शिवसनेच्या नगरसेवकांनी केली आहे. मात्र पाटणकर यांना राजीनामा देण्यास भाग पाडले तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल आणि आधीच ठाण्यात कमजोर अवस्थेत असलेल्या भाजपला ही जागा गमवावी लागल्यास त्याचा थेट परिणाम युतीच्या सत्तेवर होऊ शकतो.
पाच हल्लेखोरांवर गुन्हे
पोलिसांनी पाटणकरांवरील हल्ल्यासंदर्भात पाच अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हे दाखल केले. मात्र, या संदर्भात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पाटणकर यांच्यावर हल्ला करणारे युतीचेच नगरसेवक होते, हे लपून राहिलेले नाही. असे असतानाही फक्त पाच अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे हे नाटक असल्याचे बोलले जात आहे.
पाटणकर गायब
सोमवारच्या मारहाणीच्या प्रसंगानंतर धसका घेतलेले पाटणकर गायब झाल्याची जोरदार चर्चा मंगळवारी ठाण्यात होती. मात्र, ते गायब झालेले नसून आमच्या संपर्कात आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. युतीची कोंडी वगैरे काही होऊ शकत नाही आणि यामधून नक्कीच मार्ग निघेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.