आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • भिवधानोर्‍याच्या शेतकरी गटावर बांगलादेशचे कृषी सचिव फिदा

भिवधानोर्‍याच्या शेतकरी गटावर बांगलादेशचे कृषी सचिव फिदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - भिवधानोरा येथील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शेतकरी गटाने अल्पावधीतच नेत्रदीपक प्रगती केली. पाच वर्षांत साडेपाच कोटी रुपयांच्या बियाण्यांचा व्यवसाय करून गटातील २६५ सभासद शेतकर्‍यांना अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळवून देऊन आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कामाची दखल जागतिक बँकेसह बांगलादेशच्या कृषी मंत्रालयाने घेऊन प्रकल्पाला २० जून रोजी भेट दिली. गटाचे काम पाहून ते भारावले आणि कामाची प्रशंसा केली.

गोदाकाठ महामार्गाजवळ असणार्‍या भिवधानोरा येथील सोळा शेतकरी गटातील २६५ शेतकर्‍यांनी मिळून पाच वर्षांपूर्वी २०१० मध्ये कल्पतरू कृषी मंडळ सन्मित्र अॅग्रो सीड प्रोड्युस कंपनीची स्थापना करून सोयाबीन गव्हाच्या बियाण्यांच्या माध्यमातून साडेपाच कोटी रुपयांचा व्यवसाय करून सभासद शेतकर्‍यांना अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळवून दिल्यामुळे या शेतकरी कंपनीचा नावलौकिक जागतिक स्तरावर पोहोचला आहे. या शेतकरी गटाच्या यशोगाथेची माहिती घेण्यासाठी देशासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषीविषयक तज्ज्ञ नियमितपणे येत आहेत. देशातील कृषी क्षेत्रातील समृद्धी महिंद्रा इतर कंपन्या शेतकरी गटाला मोफत सल्ला साहाय्य देत आहेत.

एक भाग म्हणून २० जून रोजी बांगलादेशच्या वर्ल्ड बँकेचे चेअरमन सुज्योत तोडकर यांच्यासह बांगलादेशचे वित्त आयोगाचे अध्यक्ष, कृषी सचिव, उपसचिव अधिकार्‍यांनी भिवधानोरा येथे भेट देऊन शेतकरी गटाच्या माध्यमातून चालवल्या जाणार्‍या कल्पतरू कृषी मंडळ सन्मित्र अ‍ॅग्रो सीड प्रोड्युसिंग कंपनीच्या कार्याची माहिती घेतली.
या वेळी शेतकरी गटातील पदाधिकार्‍यांकडून कृषी मंडळाचे काम कशा पद्धतीने चालते, शेतकर्‍यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे कशा पद्धतीने एकत्रित आणले जाते, कृषी मालाचे मार्केटिंग कशा पद्धतीने केले जाते, राज्यातील कृषी विभाग त्यांना कशा पद्धतीने सहकार्य करतो आदी बाबींची इत्थंभूत माहिती घेतली. त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून अशाच पद्धतीने काम बांगलादेशमध्ये करता येऊ शकेल, याबाबत उपस्थितांसमोर आशावाद व्यक्त केला.

या वेळी कृषी विभागाचे उपसंचालक शिरडकर, उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, कोकाटे, कृषी अधिकारी व्ही. एस. ठके, तिवारी आदींसह कृषी मंडळाचे चेअरमन राजेंद्र चव्हाण, सुरेश चव्हाण, सोमनाथ गवारे, योगेश मोरे, भाउसाहेब शेळके, संदीप चव्हाण यांच्यासह शेतकर्‍यांची उपस्थिती होती.

दोन वर्षांत बारा कंपन्या स्थापन करणार
गंगापूरतालुक्याचे कृषी अधिकारी व्ही.एस. ठके यांनी सांगितले की, पुढील दोन वर्षांमध्ये याच धर्तीवर गंगापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना एकत्रित करून तालुक्यात दहा ते बारा कृषी उत्पादन कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामध्ये भाजीपाला, कडधान्ये, तृणधान्ये, कापूस आदी प्रकारच्या बियाण्यांचे उत्पादन करून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्यात येणार आहे.

गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील कल्पतरू कृषी मंडळाला बांगलादेशच्या वर्ल्ड बँकेचे प्रमुख सुज्योत तोडकर यांच्यासह बांगलादेशच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, कृषी सचिव अधिकार्‍यांनी भेट दिली.
बातम्या आणखी आहेत...