आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हंगामी स्थलांतरितांच्या मुलांना ‘स्वराज’चा आधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतूर - काही महिन्यांसाठी स्वत:च्या गावातून स्थलांतरित हाेणार्‍या कामगारांच्या मुलांची शिक्षण, आहार, आरोग्य व मनोरंजनाची काळजी घेणारी यंत्रणा स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानने विकसित केली आहे. २०१० पासून जालनाच्या परतूर तालुक्यात १५ गावांमध्ये सर्व्हे करण्यात आला.

२०१४-१५ शैक्षणिक वर्षात युनिसेफच्या सहकार्याने ‘स्वराज’ने ९ गावांमधील १२०० पैकी ५४५ मुलांना स्थलांतरित होण्यापासून रोखले. एवढेच नव्हे तर मुलांची शिक्षणापासून सुरक्षिततेपर्यंतची काळजी घेणार्‍या स्वयंसेवकांची यंत्रणा गावातच उभी केली. बालहक्क संरक्षण समितीही स्थापन केली. स्वयंसेवक अर्थात बालमित्र, स्थलांतरितांची मुले ज्या नातेवाइकांकडे राहतात, तिथे जाऊन त्यांचे आहार, आरोग्य, सुरक्षितता यांची काळजी घेतात. यासह मुलांना गप्पा, गाणी, गोष्टींच्या माध्यमातून त्यांना शाळेशी जोडतात. त्यामुळे आई-वडिलांविना राहणार्‍या मुलांना अगदी सुरक्षित व आनंददायी वातावरण मिळते अाहे. राज्यात प्रथमच राबवण्यात आलेली ही योजना यवतमाळी जिल्ह्यातही राबवली जात आहे.

वसतिगृहाचे वास्तव
स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाकरिता सर्व शिक्षा अभियानातर्फे २००८ पासून हंगामी वसतिगृहांची योजना राबवली जाते. इथे शिक्षण, जेवण आणि राहण्याची मोफत सोय अाहे. मात्र वसतिगृहांमध्ये मुलांना ठेवण्यास पालकांची तयारी नसते.

या गावांचा समावेश
परतूरमधील येणोरा, पांडे पोखरी, श्रीष्टी तांडा, परतवाडी तांडा, हस्तूर तांडा, वाहेगाव सा, आसन गाव, कोकाडे हादगाव, बाणाची वाडी गावांत हा प्रकल्प राबवण्यात आला.

योजनेचा विस्तार
हा प्रकल्प यवतमाळ जिल्हा तसेच अंबड व भोकरदन तालुक्यातही राबवला जाणार आहे. १५ ग्रामपंचायतींत जय अंबे व सॅक्रिड संस्थेच्या मदतीने काम सुरू आहे. - भाऊसाहेब गुंजाळ, कार्यकारी संचालक, स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान

गावे शाळाकेंद्रित
स्वयंस्फूर्त बालमित्रांमुळे मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण झाली. प्रत्येकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात त्यांना यश येत असल्याने संपूर्ण गावं शिक्षण केंद्रित झाली. - विकास सावंत, राज्य सल्लागार, युनिसेफ

बालमित्रांनी पालटले वातावरण
गावातील दर दहा मुलांमागे एका बालमित्राची नियुक्ती केली आहे. ९ गावांमध्ये स्थलांतरितांची मुले नातेवाइकांकडे राहत असली तरी ती शाळेत हजर राहण्यासाठी तसेच त्यांच्यातील वक्तृत्व, चित्रकला इ. कौशल्य विकासासाठी विविध स्पर्धा व खेळ घेतात. त्यासाठी मुलांना दर महिन्यात प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जातात. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळत आहे.
बातम्या आणखी आहेत...