आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा : दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या दाखल्यासोबतच विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजेच दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवूनही पुढील शिक्षणासाठी आवश्यक जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणा-या विद्यार्थ्यांना बीडच्या महसूल यंत्रणेने दिलासा दिला आहे. शाळेतच जातीचे प्रमाणपत्र देण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून बीड आणि गेवराई तालुक्यात आतापर्यंत सुमारे सात हजार 680 विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिकेसोबत जातीचा दाखलाही सुपूर्द करण्यात आला आहे.

शहरातील भगवान विद्यालयात शनिवारी उपविभागीय महसूल अधिकारी पी. एल. सोरमारे यांनी दहावीच्या 180 विद्यार्थी-विद्यार्थिनींना गुणपत्रिकेसोबत जात प्रमाणपत्र वाटप केले. बीड पालिकेचे मुख्याधिकारी व्ही. बी. निलावाड, भगवान विद्यालय संस्थेचे कार्याध्यक्ष गो. गो. मिसाळ, सेतूचे संचालक एच.यू. चाऊस, मुख्याध्यापक एस. बी. बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी सोरमारे म्हणाले, सप्टेंबर 2013 पासून बीड आणि गेवराई तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालय स्तरावरूनच जातीचे प्रमाणपत्र देण्याची मोहीम सुवर्ण जयंती राजस्व अभियानाद्वारे सुरू करण्यात आली. ऑक्टोबर 2013 ते आजपर्यंत सुमारे सात हजार 680 विद्यार्थ्यांना जातीच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. शालेय जीवनात या प्रमाणपत्रांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजत नाहीत; परंतु बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर उच्चस्तरीय शिक्षण घेण्यासाठी शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी जातीच्या प्रमाणत्रासह अन्य कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे ठरते.
मात्र, ही प्रमाणपत्रे मिळवताना विद्यार्थ्यांना गैरसोयीला समोरे जावे लागते. वेळेवर प्रमाणपत्र मिळाले नाही, तर सवलतींपासून वंचित राहण्याची वेळही अनेक उमेदवारांवर येते. मात्र, यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी शालेय स्तरावरच दहावीच्या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम बीड व गेवराई तालुक्यात राबवण्यात येत आहे. पालिकेचे मुख्याधिकारी निलावाड म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करतानाच आवश्यक कागदपत्रे जपत गुणवत्तेवर उच्चपदावर पोहोचावे. गो. गो. मिसाळ यांचेही भाषण झाले. मुख्याध्यापक एस. बी. बांगर यांनी प्रास्ताविक, तर देविदास डोळे यांनी सूत्रसंचालन केले.

बीड उपविभागाचा उपक्रम
- बीड उपविभागात गेवराई आणि बीड तालुक्याचा समावेश होतो. सुवर्ण जयंती राजस्व अभियानानंतर उपविभागातील सात हजार 680 विविध जातींच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शाळांनी यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यात हातभार लावावा.’’ पी. एल. सोरमारे, उपविभागीय अधिकारी
‘शासन आपल्या दारी’चा लाभ घ्या
- पूर्वी तलाठी वेळेवर भेटत नव्हते, परिणामी उत्पन्न, सातबारा यासह अन्य दाखल्यांसाठी कित्येक दिवस चकरा माराव्या लागत होत्या. मात्र, शासनाने आता बदल करत शासन आपल्या दारी असे उपक्रम सुरू केले आहे. यातील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम आहे. याचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.’’ गो. गो. मिसाळ, कार्याध्यक्ष, भगवान विद्यालय

फोटो - बीड शहरातील भगवान विद्यालयात विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिकेसोबतच जातीचा दाखला देताना पी. एल. सोरमारे, गो. गो. मिसाळ, व्ही. बी. निलावाड, एच. यू. चाऊस, एस. बी. बांगर आदी. छाया : दीपक जवकर