आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच दिवसात खोदले 10 हजार शोषखड्डे; उस्मानाबाद जिल्हा परिषदेने घडवला विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा परिषदेने आता पाणंदमुक्ती अभियान राबवण्यासाठी कंबर कसली आहे. एकाच दिवसांत वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी १० हजार ७७६ शोषखड्डे खोदण्यात आले आहेत. सोमवारी (दि. १७) पहाटे ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ही कामगिरी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. 

जिल्ह्यात पाणंदमुक्ती अभियान १०० टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट गांधी जयंतीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ‘मिशन ९० दिवस’ अभियान सुरू करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून १७ ते २३ जुलैदरम्यान १० हजार वैयक्तिक स्वच्छतागृहे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पाणंदमुक्तीपासून दूर असलेल्या गावांमध्ये सोमवारी स्वच्छतागृहासाठी खड्डे खोदण्याचा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्यासह सर्व विषय समितीचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. एकाच दिवसांत १० हजार ७७६ खड्डे खोदण्याचे काम करण्यात आले आहे. सीईओ रायते व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. यासाठी पाणी व स्वच्छता मिशन विभागाचे डाॅ. कांताप्पा खोत, केंद्र शासनाचे जिल्हा स्वच्छ भारत प्रेरक पंकज जाधव आदींनी पूर्ण केले आहे. आता २३ जुलैपर्यंत स्वच्छतागृह पूर्ण करण्याचे उद्दिष्ट गाठण्याचे काम जिल्हा परिषदेला करावे लागेल.

सोमवारी, गुरुवारी मुख्यालयात
जिल्ह्यात खड्डे खोदलेल्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्यासाठी ५५ त्रयस्थ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच तीन महिला अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली महिलांचे पथकही नियुक्त करण्यात आले आहे. यातील कर्मचारी व अधिकारी सोमवारी व गुरुवारी मुख्यालयात काम करणार आहेत. 

गवंड्यांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव
सात दिवसांच्या कालावधीत सर्वात अधिक स्वच्छतागृहांची बांधणी करणाऱ्या गवंड्यांचा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.