आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारप्रकरणी १० वर्ष सक्तमजुरी, अंबाजोगाई सत्र न्यायधीशांचा VC द्वारे निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - केज येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा राजस्थान येथील बांधकाम मिस्त्री राजुदान गेर्मदान चारण (३०) याला येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी दोषी ठरवत दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व नऊ हजार रुपये दंड ठोठावला. प्रकरणातील आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात असल्याने न्यायाधीशांनी अंबाजोगाईहून व्हीसीद्वारे बुधवारी शिक्षा सुनावली.

केजच्या मुख्य रस्त्यावरील झोपडीत राहणारे लिंबाजी वेताळ यांच्या पत्नीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. आईच्या मृत्यूनंतर झोपडीत एकटीच राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवर राजस्थान येथून केजला मजुरीसाठी आलेला बांधकाम मिस्त्री राजुदान गेर्मदान चारण याने जानेवारी २०१४ मध्ये बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे चार महिन्यांनंतर मुलगी गर्भवती राहिली. मुलीच्या वडिलांनी केजचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक अभय डोंगरे यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. केज ठाण्यात राजुदान याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात डोंगरे यांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी महत्त्वाचे पुरावे न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. लक्ष्मण फड यांनी नऊ साक्षीदार तपासले.

दंडातील पाच हजार पीडितेला द्यावेत
केज येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी राजुदान चारण याला अंबाजोगाईच्या न्यायाधीशांनी नऊ हजार रुपये दंड ठोठावला अाहे. यातील पाच हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश दिले आहेत. दीड वर्षाच्या आत या प्रकरणाचा निकाल लागला आहे.