आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साथरोगाचे थैमान : चौदा गावांत गॅस्ट्रो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घनसावंगी - घनसावंगीसह परिसरातील १४ गावांत आठवडाभरापासून गॅस्ट्रोने थैमान घातले आहे. अातापर्यंत १०० रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली असून सद्य:स्थितीत घनसावंगी ग्रामीण येथील खासगी रुग्णालयात १५ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर २४ तास उपचार सुरू अाहेत.

घनसावंगीसह तालुक्यातील डहाळेगाव, खडकावाडी, देवीदहेगाव, मच्छिंद्रनाथ चिंचोली, देवनगर, घोन्सी, देवडे हदगाव, मंगू जळगाव, रामगव्हाण, ढाकेफळ, दाजेगाव, बोडखा, घाेन्सी खुर्द या गावात गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घनसावंगी रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांत गॅस्ट्रो रुग्णांचा आकडा अधिक आहे.

या रुग्णांवर उपचार सुरू
गजानन मुळे (डहाळेगाव), दत्ता रामभाऊ खिल्लारे संजीवनी गणेश साळवे (घनसावंगी), किसन नाना पवार (देवनगर), शारदा शामराव मुके (देवडे हदगाव), तुळसाबाई पांढरे (म. चिंचोली) आदी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रुग्णांवर उपचार सुरू
रुग्णालयात रोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या ठिकाणी डॉ. आशिष राठोड, डॉ. शैलजा झाडे, परिचारिका टी. जे. शेख, एम. रोकडे, एस. एस. जाधव हे रुग्णांवर उपचार करत आहेत. -डॉ. गणेश राठोड, वैद्यकीयअधीक्षक, ग्रामीण रुग्णालय

पथक नेमावे
पर्जन्यमानाचे प्रमाण कमी असल्याने जलस्रोत जेमतेमच आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्यावरच जनतेला तहान भागवावी लागते. अनेक गावांत अजूनही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे पाण्याची तपासणी नियमित होत नाही. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसारख्या साथीचे आजार फैलावू लागले आहेत. याला वेळीच आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने गावागावांत विशेष पथक नेमावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

उपकेंद्रातील पदे रिक्त
तालुक्यात घनसावंगी येथे एकमेव ग्रामीण रुग्णालय आहे, तर सात जिल्हा परिषदेच्या सर्कल गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार केले जातात, परंतु राजाटाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांचे पद रिक्त आहे. तसेच बहुतांश उपकेंद्रांतही अशीच परिस्थिती आहे. यामुळे बर्‍याच ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञच प्राथमिक उपचार करतात.

अद्याप माहिती नाही
घनसावंगी तालुक्यातील आरोग्य कर्मचार्‍यांकडून अद्याप अशी माहिती प्राप्त नाही. तत्काळ माहिती घेऊन त्या-त्या गावातील रुग्णांवर उपचार करण्यात येतील. तसेच रुग्णांनी दूषित पाणी पिऊ नये, पाणी उकळून प्यावे. डॉ.विलास रोडे, तालुकाआरोग्य अधिकारी, घनसावंगी
बातम्या आणखी आहेत...