आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन निर्णय: दहावीतील विद्यार्थ्यांची होणार "कल चाचणी'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- विद्यार्थ्यांचाकल विचारात घेऊन त्यांना आवड क्षमतेनुसार वेळीच शैक्षणिक क्षेत्र निवडीस मदत केल्यास त्यांच्या उपजत कलागुणांना पुरेसा वाव मिळतो. इयत्ता दहावीनंतर पुढे काय याबाबत विद्यार्थी पालकात संभ्रम निर्माण झालेला दिसून येतो. या परिस्थितीत त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते, ही बाब लक्षात घेऊन वर्ष २०१५-१६ पासून इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची कल चाचणी घेतली जाणार आहे.

राज्याचा १०-२-३ हा शैक्षणिक आकृतीबंध विचारात घेता प्रत्येक टप्प्यावर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक क्षेत्र व्यवसायांची माहिती देणे उपयुक्त आहे. विद्यार्थ्यास स्वत:च्या कुटुंबाबरोबरच भारतीय समाजरचनेचा एक जबाबदार सुसंस्कृत नागरिक घडविण्याची जबाबदारी पालक शाळेची आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना अनुरूप मार्गदर्शन साहाय्य देण्याची आवश्यकता आहे. मानसशास्त्रीय कसोट्यांद्वारे उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यासाठी धोरण कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.

तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने मानसशास्त्रीय कसोटी पुनर्रचित करण्यात येईल. याबाबतची जबाबदारी व्यवसाय मार्गदर्शन निवड संस्थांची असेल. मुंबईतील मार्गदर्शन निवड संस्थेकडे असलेल्या मानसशास्त्रीय कसोट्या ऑनलाइन पद्धतीने घेण्याकरिता संगणक प्रणाली विकसित करण्यात येईल. यासाठी पुणे येथील राज्य मंडळाची मदत घेतली जाणार आहे. ज्याठिकाणी ऑनलाइन पद्धतीने कल चाचणी घेणे शक्य होणार नाही, त्याठिकाणी ऑफलाइन पद्धतीने कलचाचणी घेण्याकरिता ओएमईआर पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. या कार्यपद्धतीसाठी शिक्षण आयुक्त (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गट स्थापन करण्यात येणार आहे.

कृती आराखडा
महाराष्ट्रराज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी (कल चाचणी) घेऊन कल अहवाल तयार करण्यात येणार आहे. यात नोव्हेंबर २०१५ ते डिसेंबर २०१६ असा १४ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर सर्व प्रकल्पाचा अभ्यास करून संशोधन अहवाल तयार करणे, मानसशास्त्रीय कसोट्यांवर आधारीत संशोधन निरंतर पुढे सुरू ठेवण्याचे काम मार्च २०१७ पासून होणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद, पुणे)आणि व्यवसाय मार्गदर्शन निवड संस्था यांच्यावर ही जबाबदारी असेल.

विद्यार्थ्यांना होईल १०० टक्के लाभ
>दहावीनंतर विद्यार्थ्यांचा नेमका कल कोणत्या क्षेत्राकडे आहे, हे मानसशास्त्रीय चाचणीतून लक्षात येईल. यामुळे उच्च शिक्षणाची दिशा निश्चित होऊन आवडीच्या क्षेत्रात विद्यार्थी करिअर करू शकेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. शहरातील काही पालक तज्ज्ञांकडून मुलांची मानसशास्त्रीय चाचणी करून घेतात त्यानुसार क्षेत्र निवडतात. ग्रामीण भागात याबाबत तितकी जागरूकता नाही. यामुळे शासनाने घेतलेल्या कल चाचणीच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना १०० टक्के लाभ होईल.
-बालाजी शेवाळे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, जि.प.जालना