आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - बिनधास्त स्वभावामुळे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पाहून हळवा झाला. डोळ्यातील आसवांना थोपवून धरत त्याने या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि समाजातील सधन व्यक्तींनी मदत करण्यासाठी पुढे यावे असे भावनिक आवाहन केले. बाबा आमटेंचा आदर्श ठेवून सामाजिक कामांमध्ये नेहमीच पुढे असणाऱ्या नानांच्या स्वभावाचे वेगळे रूप या साध्या कार्यक्रमातून दिसून आले. मोडलेल्या माणसांची दु:ख ओली झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, कोणती ना जात ज्यांची कोणता ना धर्म ज्यांना, दु:ख भिजले दोन अश्रू माणसाचे माणसांना या बाबा आमटेंच्याच अोळी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंच्या या उपक्रमाला साजेशा ठरल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी सर्वच क्षेत्रांमधून चिंता व्यक्त होत असताना मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी नाना पाटेकरांच्या पुढाकारातून मराठी सिनेसृष्टीतील तारे सरसावले आहेत. बीड जिल्ह्यातील ११२ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना रविवारी नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, गीतकार अरविंद जगताप, नितीन नेरूरकर, रवींद्र बनसोड यांच्या उपस्थितीत मदतीचे वाटप करण्यात आले. मला खरं तर प्रत्येकाच्या घरीच यायचं होत पण आज तुम्हालाच इथपर्यंत यावं लागतयं याबद्दल मी क्षमा मागतो म्हणत नाना पाटेकरांनी आपल्या संवादाला सुरुवात केली आणि पुढे अर्धा, पाऊण तास आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत विविध प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले.

पाटेकर म्हणाले, रोज माध्यमांमधून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या वाचून त्रास होेत होता. आपण या शेतकऱ्यांसाठी काय करू शकताे असे सारखे वाटत होते आणि मकरंद अनासपुरे व इतरांच्या सहकार्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना धीर देेण्यासाठी मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेवटी समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहे. आपल्या घरात हा प्रसंग आला नाही म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही. म्हणून मदत करत आहोत. हा काही या कुटंुबीयांवर आम्ही केलेला उपकार नसून समाजाचे आपण भाग असल्याने ही माझी जबाबदारी होती. शहरात राहत असलो तरी मीही याच मातीतला आहे, मलाही इथे उपस्थित शेतकऱ्यांच्या भावंडांना मिठी मारावीशी वाटते आहे. समाजात अनेक सधन लोक आहेत मात्र आम्ही खिशात हात घालायला विसरलो आहोत. त्यामुळे सधन व्यक्तींनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येऊन आपापल्या परिने मदत करावी. आम्ही त्या लोकांना सहकार्य करू असे सांगत नानाने मदतीची चळवळ सुरू करण्याचे आवाहन केले. पुढच्या वेळी कुणाच्या तरी घरी जेवायला येईन म्हणत आपलेपणाने नानाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या धीराने उपस्थित शेतकरी, कुटुंबीयही भारावले होते. रवींद्र बनसोड यांनी प्रास्ताविक केले.

शहरातून वानोळा घेऊन आलोय
राज्यकर्त्यांनी थोडंसं सुज्ञ होऊन माणसासारखं वागावं, असे मत मकरंद अनासपुरे यांनी या वेळी व्यक्त केले. आज टिकल्या विकणारा बिझनेसमन आहे. पण देशाला धान्य पुरवणारा शेतकरी बिझनेसमन नाही. देश दलालांचा झाला असून शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची वेळ आली हीच खरी समस्या असून आमच्या सामाजिक संवेदना बोथट झाल्या आहेत का, असा सवाल अनासपुरे यांनी केला. आजही ग्रामीण माणूस शहरात आला तर गावाकडून पिशवीभर वानोळा आणतो, पण शहरातील माणसं गावाकडं रिकाम्या हाताने जातात. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मी शहरातून वानोळा घेऊन आलोय, असे मकरंद म्हणाला.

बीडकरांचे दातृत्व
मकरंद म्हणाला, सयाजी शिंदे, दिलीप प्रभावळकर, रेणुका शहाणे, जितेंद्र जोशी, नितीन नेरूरकर, पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह अनेकांनी मदत केली. या वेळी उपस्थितांमधून फिरवण्यात आलेल्या मदतनिधीच्या पेटीत २२ हजार रुपये जमले. तर स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उद्योजक गौतम खटोड यांनी १ लाख १२ हजारांची मदत केली. ही मदत तत्काळ उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली. दहा हजारांच्या मदतीचा आकडा यामुळे १३ हजार दोनशेवर गेला.