आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Villages Demands To Give Water From Nandur Madhameshwar

वैजापूर, गंगापूर तालुक्यांतील गावे तहानली, नांमकातून पाणी सोडण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - गंगापूर व वैजापूर तालुक्यांत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरे पाण्याअभावी हाल होत असल्याने दोन्ही तालुक्यांसाठी निर्धारित असलेले नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे सोडण्यात येणा-या तिस-या उन्हाळी आवर्तनाचे पाणी तातडीने सोडावे, अशी मागणी गंगापूर तालुका पाटपाणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या पाण्यामुळे दोन्ही तालुक्यांतील शंभरावर गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.

बुधवारी पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये पाण्याअभावी होत असलेल्या नागरिक व जनावरांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने पाण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले.

टेलची गावे कायम वंचित
सोडण्यात येणा-या प्रत्येक आवर्तनाचे पाणी टेल टू हेड या न्यायाने सोडणे अपेक्षित असतानाही नांदूर मधमेश्वर कालव्याचे शेवटचे टोक असलेल्या गंगापूर तालुक्यातील भेंडाळा, अंतापूर, पेंडापूर, कानडगाव, भालगाव व इतर गावांमधील शेकडो शेतक-यांना पोटचा-या व कालवा सुरू झाल्यापासून नांमकाचे पाणी पाहायला मिळालेले नाही.

काटेकोर नियोजन करावे
नांमकाद्वारे प्रत्येक वेळी सोडण्यात येणा-या आवर्तनाच्या पाणी वाटपाचे नियोजन करण्यात नांमका प्रशासन आतापर्यंत अपयशी ठरल्यामुळे अनेक लाभधारक गावांना या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे येणा-या आवर्तनाचे काटेकोर नियोजन करून गंगापूर तालुक्यातील टेलच्या व इतर सर्व गावांना पाणी मिळण्यासाठी नांमका प्रशासनाला आदेशित करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर समितीचे अध्यक्ष अॅड. कृष्णा ठोंबरे, रामनाथ वाघ, एकनाथ थोरात, सुभाष धोत्रे, बच्चू पाटील दारूंटे, सुरेश दारूंटे, अॅड. विश्वास कसाने, रवींद्र दारूंटे यांच्यासह इतर लाभधारक शेतक-यांच्या सह्या आहेत.