आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांत मराठवाड्यातील 1400 मुली बेपत्ता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- एकीकडे राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना दुसरीकडे राज्यात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाणही चिंताजनक असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. तीन वर्षांत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतून 1370 मुली बेपत्ता झाल्याची संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये नोंद आहे. यापैकी 1136 जणांचा तपास लावण्यात पोलिस प्रशासनास यश आले असले तरी जवळपास 234 मुलींचे काय झाले, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवणे, लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन वाममार्गास लावणे, नोकरीचे आमिष दाखवून शोषण करणे अशा घटनांमुळे महिलांच्या, तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत जबदरस्तीने अत्याचारांच्या घटनांतही वाढ झाल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यातील बेपत्ता होणार्‍या मुलींची संख्या चिंताजनक आहे. सन 2009 ते 11 या कालावधीत पोलिस प्रशासनाच्या नोंदीनुसार 24 हजार 238 मुली बेपत्ता झाल्या. यापैकी 20 हजार 459 मुलींचा तपास लागला असला तरी तीन हजार 779 मुली अद्याप बेपत्ता आहेत. राज्यात मागास भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठवाड्यातील मुलींची बेपत्ता होण्याची संख्या चिंताजनक आहे.

फूस लावून पळवण्याचे प्रकार
बेपत्ता झालेल्या बहुतांश प्रकरणांत आपल्या मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींची संख्या जास्त आहे. पळून गेलेल्या मुलींना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अब्रूच्या धास्तीने घरीही परतता येत नाही. अशा वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास त्या वाममार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आमिषाने वेश्याव्यवसाय
ग्रामीण भागातून शहरात स्थायिक झालेल्या काही महाठकांकडून काही हजारांत मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्याच्या घटनाही उघडकीस आलेल्या आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील वयात येणार्‍या मुलींना हेरून नोकरीच्या आमिषाने शहरी भागात नेणे व तेथे कुंटणखान्यावर अवघ्या 20 ते 25 हजारांत विक्री करून वाममार्गास लावण्याचे प्रकार मुंबई, पुणे येथे उघडकीस आले आहेत. यामध्ये मराठवाड्यातील मुलींचाही समावेश होता.