आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Days School Holidays To Paid Goddess Vow In Parli

देवीचा नवस फेडण्यासाठी शाळेला 15 दिवस सुटी, परळी तालुक्यातील प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी वैजनाथ - अनिष्ट रूढी आणि परंपरेचा फटका तालुक्यातील गर्देवाडी जिल्हा परिषद शाळेतील 85 विद्यार्थ्यांना बसत आहे. शाळेसमोरील देवीला आषाढ महिन्यातील 15 दिवसांत रोजच शेकडो कोंबड्या, बकर्‍यांचा बळी दिला जात असल्याने शाळाच भरवली जात नाही. देवीच्या नवसापोटी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे.

परळी वैजनाथ तालुक्यातील शेवटचे तसेच अंबाजोगाई, किल्लेधारूर तालुक्याच्या सरहद्दीवरील डोंगर कपारीत वसलेले गर्देवाडी हे छोटंसं गाव सध्या देवीच्या आषाढ यात्रेमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. परळीपासून 40 किलोमीटर आणि अंबाजोगाईपासून केवळ 22 किलोमीटरवरील गर्देवाडीचा परिसर डोंगराळ असल्याने बहुतांश कुटूंब ऊसतोडणीला जातात. गर्देवाडी परळी तालुक्यात असली; तरी बाजारपेठ मात्र अंबाजोगाईचीच. गावापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत कोणतेच गाव नाही.

एक हजार लोकसंख्येच्या या वाडीत पहिली ते पाचवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. पाच वर्गातील 85 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तीन शिक्षक आहेत. वाडीत प्रवेश करताच मरईआईचा पार लागतो. देवीच्या पाराच्या पाठीमागेच जीर्ण झालेल्या इमारतीत शाळा भरते. मरई आई नवसाला पावणारी म्हणून या देवीची दूरवर ख्याती आहे. या देवीला पिढय़ान्पिढय़ा बोकड आणि कोंबड्यांचा बळी देऊन नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत गर्देवाडी व लगतच्या 50 गावांतील भाविक नवस फेडण्याला येतात. यंदा 13 जुलैपासून नवस फेडण्याला सुरवात झाली.

26 जुलैपर्यंत नवस फेडले जातील. दररोज शेकडो कोंबड्यांचा व बोकडांचा बळी दिला जातो. मरईआईच्या पाराला लागून असलेल्या हौदात कोंबड्या, बोकडांचे मुंडके नैवेद्य म्हणून टाकले जातात. शाळेपासून केवळ 30 फुट अंतरावरील हौदात मुंडके टाकल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते. शाळाही दुर्गंधीच्या फेर्‍यात अडकली जाते. शाळाच नाही तर वाडीत ही दुर्गंधी पसरूनही दुर्गंंधीचा उल्लेख करायचा नाही ! का तर देवी कोपेल ! ही अंधर्शद्धेची भावना गावकर्‍यांच्या मनात घर करून बसलेली असते. बाहेर गावाहून येणारे भाविकही नवस फेडून मोकळे होतात. या सगळ्या प्रकाराचा सर्वाधिक त्रास विद्यार्थ्यांना होतो. 15 दिवस शाळेसमोरच बोकड, कोंबड्या कापण्यात येत असल्याने शाळेला 15 दिवस चक्क सुट्टी असते.

मंदिराच्या पारावर शाळा
शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने या गावाला भेट देऊन शाळेचा शोध घेतला. मात्र, शाळेला कुलूप होते. बाजूलाच विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या पारावर तासभर शाळा भरवून विद्यार्थ्यांना घरी पाठवल्याचे नागरिकांनी सांगितले.

जिल्हा परिषदकडे प्रस्ताव दाखल
गावातील नामदेव गडदे आणि ज्ञानेश्वर गडदे यांनी शाळेसाठी 20 गुंठे जमीन दान दिली आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झेडपीकडे प्रस्ताव दाखल केला. विशेष म्हणजे या शाळेत पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक जे. एस. देशमुख कार्यरत आहेत.

सगळ्यांच्याच तोंडावर बोट
देवीच्या पारापासून 100 फुटांवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. या मंदिराच्या ओट्यावर विद्यार्थ्यांना तासभर बसवून सोडून देण्यात येते. गर्देवाडी येथील विद्यार्थ्यांचे दरवर्षी महिनाभर नुकसान होते. परंतु अंधर्शद्धेमुळे एकही पालक या प्रकराबाबत बोलण्यास तयार नाही.