आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Thousand Farmers Get Half Rate Medical Facility

पंधरा हजार शेतकऱ्यांना निम्म्या दरात वैद्यकीय सुविधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - यंदाच्या भीषण दुष्काळामुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना पैशांअभावी जीवनावश्यक वैद्यकीय सुविधा मिळणेही अवघड झाल्याचे ओळखून उदगीरच्या लाइफकेअर हॉस्पिटल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने पंधरा हजार शेतकऱ्यांना निम्म्या दरात वैद्यकीय सुविधा दिल्या जात आहेत. आणखी पंधरा हजार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर हे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचे अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. उदगीरभोवतालच्या ५० किमीच्या त्रिज्येभोवतालची सर्व गावे नित्याच्या व्यवहारासाठी उदगीरला जोडलेली आहेत. तेथील वैद्यकीय गरज लक्षात घेऊन चार वर्षांपूर्वी डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी लाइफकेअर हॉस्पिटलची उभारणी केली. मुंबई-पुण्यातील रुग्णालयाच्या बरोबरीने सुविधा देतानाच अत्यंक माफक दर ठेवण्यात आला. त्यातच या वर्षी दुष्काळाने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे शेतकरी कुटुंबातील एखादा सदस्य आजारी पडला तर त्याच्या वैद्यकीय खर्चासाठीही त्यांना तडजोडी कराव्या लागत होत्या. ही बाब ओळखून लाइफकेअरच्या संस्थापिका डॉ. अर्चना पाटील यांनी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एका योजनेचा प्रस्ताव ठेवला.
बाजार समितीचे सर्वेसर्वा माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांनीही त्याला प्रतिसाद दिला. सातबारा आणि ओळखपत्र दिल्यास शेतकऱ्याच्या नावाने लाइफकेअर हॉस्पिटलमध्ये एक कार्ड बनवले जाते. प्रतिकार्ड ४०० रुपये बाजार समिती हॉस्पिटलकडे जमा करते.
या योजनेला ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे नाव देण्यात आले आहे. या योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले असून दुष्काळग्रस्तांना अशा पद्धतीने आधार देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

काय आहेत सुविधा
कार्ड ज्याच्या नावे आहे त्या शेतकऱ्याला तपासणी शुल्क माफ. दाखल असलेल्या रुग्णाच्या एकूण वैद्यकीय बिलात ५० टक्के सूट. सोनोग्राफी, एक्स-रे, रक्त-लघवी तपासणी यावरही ५० टक्के सूट. रुग्णाला लागणाऱ्या औषधींवर १० टक्के सूट. कुटुंबांतील सदस्यांसाठी २० टक्के सवलत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असून अत्यंत माफक खर्चात वैद्यकीय उपचार मिळत आहेत.

कुणी वंचित राहू नये म्हणून
वैद्यकीय खर्च वाढले आहेत. दुष्काळाने खचलेल्या शेतकऱ्याला आजार अंगावर काढावे लागत असल्याचे कळल्यानंतर वेदना झाल्या. त्यांच्यासाठीच रुग्णालय उभारले आहे. दुष्काळातून बाहेर पडायला किमान दोन वर्षे लागतील. त्यामुळे या काळात कोणीही वैद्यकीय सेवांपासून वंचित राहू नये यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर ही योजना काढली आहे.
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, संस्थापक, लाइफकेअर हॉस्पिटल, उदगीर

शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांसाठी
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोट्यवधींची उलाढाल होते. त्यातून बाजार समितीला नफा मिळतो. तो शेतकऱ्यांचाच पैसा असून तो त्यांच्यावरच खर्च करावा अशी आमची भावना आहे. यापूर्वी पंतप्रधान विमा योजनेचे पैसे आम्ही भरले. लाइफकेअरकडून प्रस्ताव आल्यानंतर आम्ही तातडीने होकार दिला. पंधरा हजार शेतकरी सदस्य झाले असून आणखी पंधरा हजार जणांना सदस्यत्व दिले जाणार आहे. -चंद्रशेखर भोसले, माजी आमदार