आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाती संघटनांतील स्वार्थामुळे समरसतेत अडसर: प्रा. मोरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- जन्मावर आधारलेल्या जातीसंस्थेचे रूपांतर भौतिक लाभ व राजकीय संबंधावर आधारलेल्या जाती संघटनात झाले असून इतिहासाचा उपयोग जाती-जातीत दुजाभाव वाढवण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे समरसतेा स्थापण्यात अडसर येत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शेषेराव मोरे यांनी रविवारी येथे आयोजित 16 व्या समरसता साहित्य परिषदेच्या उद्घाटनपर कार्यक्रमात केले.

संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उद्घाटक डॉ. अशोक कुकडे, प्राचार्य लक्ष्मण टोपले, डॉ. श्यामा घोणसे, विश्वास गांगुर्डे, भीमराव गस्ती, संजय कांबळे, प्रा. मधू जामकर, डॉ. महेश देवधर यांची उपस्थिती होती.

मोरे म्हणाले, हिंदू समाजातील एकतेचा अभाव जातीसंस्थेत दडला आहे. त्याला हिंदू ऐक्यापेक्षा त्याच्या जात, पोटजात, कुळ, भाषेचा अभिमान वाटतो व त्याच्याच ऐक्याची गरजही वाटते. सर्व हिंदू जातीचे संघटन करून हिंदूंचे राजकीय सार्मथ्य वाढवण्यात त्याला रस नाही. एकतर तो जात-पोटजाती गोंजारत बसतो नाहीतर विश्वबंधुत्वाच्या उदात्त पातळीवर पोहोचतो. यात हिंदू एकात्मता म्हणून एक पायरी असते याचा त्याला विसर पडला आहे. हे जाणले असते तर त्याला सहा-सात शतके राजकीय दास्यत्वात राहावे लागले नसते की देशाची फाळणीही झाली नसती. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न हा मूलत: हिंदू एकात्मतेचा प्रश्न असून हिंदू समाज समरस झाला तर राष्ट्रीय एकात्मता वास्तवात येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आज मानवी मूल्यावर आधारलेल्या राज्यघटनेमुळे व आधुनिक जीवनपद्धतीमुळे जन्मजात उच्च-नीचता संपली आहे. जातीसंस्थेतील बेटीबंदी वगळता सर्व बेड्या तुटल्या आहेत, तरीही स्वार्थी खेळ्यांमुळे जाती संघटना प्रबळ होत आहेत. असे असतानाही समरसता साहित्य परिषद समरसता आणत आहे, असेही ते म्हणाले.