आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 186 Types Of Birds In Nanded, Parbhani's Godavari Basin Area

नांदेड, परभणीतील गोदावरी नदीच्या परिसरात १६८ प्रजातींचे पक्षी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - नांदेड, परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीचा परिसर, या भागातील ११ तलाव आणि इतर पाणवठ्याच्या ठिकाणी १६८ पक्षी प्रजातींचे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे.
विद्यापीठातील जैवतंत्रशास्त्र संकुलातील प्रो. एस. जी. चव्हाण व त्यांच्या अभ्यास गटाने २०१२ पासून शास्त्रीय पद्धतीने पक्षी प्रजातींच्या वास्तव्या, खाण्याच्या व घरटी बांधण्याच्या जागाबाबत, स्थलांतराबाबत निरीक्षण करून नोंदी ठेवल्या आहेत.

निरीक्षणात आढळून आलेल्या १६८ पक्षी प्रजातींपैकी ७३ जाती चिमणी वर्गातील तर बगळ्यांच्या १८, बदकांच्या १४, कबुतर वर्गाच्या ८, गरुड वर्गातील ९ आणि इतर जातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. या अभ्यासात जवळपास नामशेष होण्याचा धोका असलेल्या पक्ष्यांचे सुद्धा वास्तव्य असल्याचे दिसून आले. यामध्ये पेंटेड स्टार्क, ब्लँक हेड इबीस, रिव्हर टर्न, परपल हेराॅन, ग्रेट फ्लेमिंगो, आफ्रिकन बाझ या महत्त्वाच्या पक्ष्यांचा समावेश आहे. ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डाॅ. ए. एन. कुलकर्णी यांनी २००५ मध्ये १५१ पक्ष्यांची नोंद केली होती. इंटरनॅशनल जर्नल आॅफ करंट रिसर्च अँड अकॅडमिक रिव्हिह्यूमध्ये नुकत्याच प्रकाशित शोधनिबंधात प्रो. चव्हाण यांच्या अभ्यासगटाने पक्ष्यांच्या जातीचे सचित्र वर्णन व माहिती दिली आहे.

मानवनिर्मित कारणांचा धोका
या निरीक्षणात काही पक्षी प्रजाती हिवाळ्यामध्ये व उन्हाळ्याच्या सुरुवातीला रशिया, फिलिपाइन्स, सोमालिया, केनिया, उत्तर भारत, गुजरात या ठिकाणाहून या परिसरात आल्याचे आढळले. मात्र, त्यांचे वास्तव्य अल्पावधीचेच होते. पाण्याच्या स्रोतामध्ये विशेषत: नद्यांमध्ये प्रक्रिया न करता सोडले जाणारे गटाराचे पाणी, नदी व तलावातून होणारा पाण्याचा अतिउपसा, सतत केली जाणारी मासेमारी, पाणवठ्यांच्या परिसरातील जंगलतोड, पक्ष्यांची शिकार, प्लास्टिक आणि इतर कुजणाऱ्या वस्तूंचा पाण्यात होणारा विसर्ग, नद्यातून होणारा वाळू उपसा या मानवनिर्मित कारणामुळे पक्षी वास्तव्यास अडचण, धोका निर्माण होत असल्याचे प्रो. चव्हाण यांनी संशोधनात म्हटले आहे.