आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात मामा-भाच्याचा मृत्यू, पाच जण जखमी, बदनापूरजवळ नॅनो कार पुलाच्या कठड्याला धडकली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- भरधाव नॅनो कार पुलाच्या कठड्याला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर पाच जण जखमी झाले. औरंगाबाद-जालना महामार्गावर बदनापूर तालुक्यातील फाट्याजवळ शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. भागवत बळीराम सैनात आणि सोपान रामचंद्र साबळे अशी मृतांची नावे आहेत, तर पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
परभणी येथील लग्नसोहळा आटोपून सैनात आणि साबळे परिवारातील सात जण नॅनो कारने (एमएच २० एजी १८८४)  औरंगाबादकडे जात हाेते. ही कार बदनापूरपासून  काही अंतरावर पुढे गेली असताना वरुडी फाट्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला धडकली. यात भागवत बळीराम सैनात (१०, एकरुखा, ता. जि. परभणी)  या बालकासह त्याचा मामा कारचालक सोपान रामचंद्र साबळे (राजोना, ता. वसमत, जि. हिंगोली) हे दोघे ठार झाले. तर संगीता सोपान साबळे, बळीराम नारायणराव सैनात, त्यांची पत्नी रुख्मिणी बळीराम सैनात, मुलगी शारदा बळीराम सैनात व सोपान साबळे यांचा मुलगा असे पाच जण जखमी झाले.  

अपघातानंतर जखमींना वरुडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे, तपास जमादार इब्राहिम शेख हे करत आहेत. सैनात कुटुंबीय परभणीचे आहे तर साबळे कुटुंबीय सध्या औरंगाबाद येथे वास्तव्यास असल्याचे पाेलिसांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...