Home »Maharashtra »Marathwada »Other Marathwada» 2 Killed In Road Accident At Jalna

जालना: टिप्परची दुचाकीला धडक; दोन युवक जागेवरच ठार, एक गंभीर जखमी

प्रतिनिधी | Mar 20, 2017, 10:12 AM IST

  • जालना: टिप्परची दुचाकीला धडक; दोन युवक जागेवरच ठार, एक गंभीर जखमी
जालना-दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. औरंगाबाद-जालना रोडवर नागेवाडी गावाजवळ रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मृत आणि जखमी असे तिघेही बदनापूर तालुक्यातील रमदुलवाडी या गावातील असून ते पोलिस भरतीचा सराव करण्यासाठी जालना क्रीडा संकुलावर जात होते.

पोलिस भरतीचा सराव करण्यासाठी हे तिन्ही युवक रमदुलवाडी येथून पहाटे पाच वाजेच्या सुमारास जालना क्रीडा संकुलावर निघाले होते. साडेपाच वाजेच्या सुमारास ते नागेवाडी गावाजवळ आले तेव्हा गावातून जालना रोडवर येणाऱ्या एका भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जाेराची धडक दिली. यात चरण खुशालसिंग कवाळे (२१), सजन केशरसिंग बहुरे (१९) यांचा जागेवरच मृत्यू झाला तर अनिल देवचंद नेमाने (२१) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी आैरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी राजेवाडी येथील सरपंच कचरूसिंग घुसिंगे यांच्या तक्रारीवरून टिप्परचालक सोमीनाथ पांडुरंग दानवे याच्याविरोधात चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने रमदुलवाडी गावावर शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच येथील अनेक युवकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

पोलिस भरतीसाठी अाटापिटा
रमदुलवाडीहे अवघे चारशे लोकवस्तीचे गाव आहे. येथून चार युवक पोलिस दलात अाहेत. आता भरती प्रक्रिया सुरू असून येथील अनेक युवकांनी पोलिस दलासाठी अर्ज दाखल केले आहेत. रमदुलवाडी ते जालना हे अंतर जवळपास १५ किलोमीटर आहे. जवळ मैदानी चाचणीचा सराव करण्यासाठी चांगले मैदान नसल्याने येथील युवक दुचाकीवरून जालना जिल्हा क्रीडा संकुलावर येऊन सराव करत होते.

पोलिस होण्याअगोदरच काळाचा घाला
मृत चरण सजन यांनी पोलिस भरतीसाठी तयारी केली होती. चरणने यापूर्वी नागपूर राज्य राखीव पोलिस दलासाठी अर्ज दाखल केला होता. सरावादरम्यान पायाला दुखापत झाल्याने तेव्हा त्याला मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षभरात त्याने जोमाने तयारी केली होती, तर अवघ्या १९ वर्षांच्या सजन यानेही इतर मित्रांच्या मदतीने चांगली तयारी केली होती.

Next Article

Recommended