आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफा पेढीत घुसून २ किलो सोने लुटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- शहरातील वजिराबादसारख्या गजबजलेल्या भागात मेन रोडवरील पायल ज्वेलर्सवर शुक्रवारी सायंकाळी साडेआठच्या सुमाराला दोन सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा घातला. या लुटीत दरोडेखोरांनी जवळपास दोन किलो सोने लंपास केल्याचा अंदाज आहे. या घटनेने शहरातील व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पल्सर मोटारसायकलवरून दोन दरोडेखोर आंबेकर यांच्या घराच्या गल्लीतून आले. त्यांनी आंबेकर यांच्या घरासमोरच मोटारसायकल ठेवली. ते दोघेही पायी रस्ता ओलांडून पायल ज्वेलर्समध्ये आले. त्या वेळी दुकानाचे मालक ओमप्रकाश वर्मा व अॅड. विवेक नांदेडकर हे दोघे दुकानाच्या आतील केबिनमध्ये होते. दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करताच थेट सोन्याचे दागिने ठेवलेल्या ट्रेकडे मोर्चा वळवला. दुकानातील लोकांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी "चल निकाल' असे शब्द उच्चारले. त्यानंतर त्यातील एक जण दुकानाच्या प्रवेशद्वारावर बंदूक घेऊन पहारा देत राहिला. अवघ्या १०-१५ मिनिटांत लूट करून दोघेही आरामात मोटारसायकलच्या दिशेने चालत गेले.

दगड भिरकावले
दरोडेखोर निघून जात असताना दुकानमालक व इतरांनी आरडाओरड केली. यानंतर काही जणांनी दरोडेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी त्यांच्या दिशेने दगड भिरकावले. तेव्हा लोकांना घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार करत दरोडेखाेर पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया, अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, पोलिस निरीक्षक रघुनाथ कदम व इतर पोलिसांचा ताफा पायल ज्वेलर्समध्ये पोहोचला. पोलिसांनी नाकेबंदी केली. दुकानात नेमकी किती रुपयाची लूट झाली याची माहिती दुकानातील स्टॉक मोजल्यानंतर मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. तथापि प्राथमिक अंदाजानुसार जवळपास दीड-दोन किलो सोन्याचे दागिने लुटून नेले असावेत, असा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच शहरातील प्रमुख व्यापारीही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, २ मार्च रोजी नवा मोंढा येथील एका दुकानाच्या मुनिमाला दोन दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून ९० हजारांना लुबाडले. त्या घटनेतील आरोपींचा शोध सुरू असताना शुक्रवारी दरोडेखोरांनी धुडगूस घालत पायल ज्वेलर्स लुटले.