आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कटू आठवणी नकोत म्हणून त्यांनी केले स्थलांतर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- किल्लारीसह लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या भूकंपाला 30 सप्टेंबर 2013 रोजी 20 वर्षे पूर्ण होत आहेत. जिवाचा थरकाप उडवणार्‍या या काळ्याकुट्ट आठवणी आजही किल्लारी, सास्तूरसह शेकडो गावकर्‍यांना अस्वस्थ करतात. काही क्षणांत गावेच्या गावे उद्ध्वस्त करणार्‍या या भूकंपानंतर एक पिढी सरली असली तरी त्या पिढीवर या आघाताचे दीर्घकालीन परिणाम झाले. प्रियजनांना गमावण्याचे दु:ख सहन न झाल्याने शेकडो तरुण मनोरुग्ण झाले. तर, या आठवणी पुसून टाकण्यासाठी अनेक जण वडिलोपाजिर्त जमिनी विकून स्थलांतरित झाले.

सामाजिक संस्थांचा पुढाकार : भूकंपानंतर शासन, सामाजिक संस्थांनी केलेल्या मदतीमुळे गावांचे पुनर्वसन झाले. शाळा, रस्ते, दवाखाने बांधून देण्यात आले. अनेक अनाथ मुलांना सामाजिक संस्थांनी आधार दिला. लातूर शहरात एसओएस भारतीय बालग्राम, जनकल्याण, चिल्ड्रन्स पॅनियल होम या संस्थांनी अनाथ मुलांच्या पुनर्वसनात मोलाची भूमिका बजावली आहे. या संस्थांमुळे अनेक जण आज स्वत:च्या पायावर उभे आहेत. एसओएसने अनाथ मुलांचे पालकत्व घेतले. विविध गावांत अंगणवाड्या बांधून दिल्या. भूकंपानंतर आज अनेक सामाजिक, आर्थिक बदल झाले आहेत. 1993 मध्ये भूकंपातून वाचलेली, त्या वेळी पाच-दहा वर्षे वय असलेली मुले आज शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभी आहेत. या घटनेत सर्वस्व गमावलेल्या काही मुलांनी त्या दु:खद आठवणी नको म्हणून गावाकडची वडिलोपाजिर्त शेती, घरे विकून गाव कायमचे सोडले. तर काही नोकरी, व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद आदी शहरांसह विदेशात स्थायिक झाले आहेत.

पुनर्वसनाचा असाही फटका
1993 पूर्वी ग्रामीण भागातील बहुतांश घरे दगडमातीची होती. ही घरे पडल्यानंतर शासनाने मूळ गावापासून लांब नवीन गाव वसवले. ग्रामस्थांना पक्कीघरे बांधून दिली. मात्र जुन्या गावापासून 5-6 कि.मी. अंतरावर नवीन गाव वसवल्यामुळे शेती लांब पडू लागली. रोज एवढे अंतर चालून जाणे शक्य नसल्याने कालांतराने अनेक शेतकर्‍यांनी शेती बटईने कसण्यास दिली, तर काहींनी विकून दुसरा व्यवसाय सुरू केला.

स्थलांतरितांची संख्या वाढली
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला. किल्लारी, लिंबाळा (दाऊ), हारेगाव, तळणी, बाणेगाव, गुबाळ, मंगरूळ, गांजनखेडा, लामजना, चिंचोली, दापेगाव अशी शेकडो गावे विस्थापित झाली. पक्की घरे, रस्ते, शाळा, दवाखाने आदी सुविधा मिळाल्या. मात्र रोजगाराच्या संधी म्हणाव्या तशा निर्माण झाल्या नाहीत. औसा तालुक्यात पर्जन्यमान कमी आहे. यामुळे दिवसेंदिवस शेतीचे उत्पन्न घटत आहे. पर्यायाने रोजगाराच्या शोधात स्थलांतर करणार्‍यांची संख्या वाढली आहे. हीच स्थिती उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर, माकणी, लोहारा आदी गावांची आहे.

सामाजिक संस्थांमुळे मुलांचे पुनर्वसन
1994 मध्ये एसओएस या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेने लातूर शहरात भूकंपातील अनाथ मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली. शहरातील नांदेड नाका परिसरात सुसज्ज घरे, शाळा बांधली. मुला-मुलींचे शिक्षण, त्यांचे विवाह, नोकरीसाठी मदत करण्याचे काम ही संस्था आजही करत आहे. संस्थेत शिक्षण घेऊन बाहेर पडलेली अनेक मुले आज स्वत:च्या पायावर उभी आहेत.
- डॉ. एल.एन. दानवाडे, व्हिलेज डायरेक्टर, एसओएस बालग्राम, अलिबाग