आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: नोटबंदीच्या काळात पोस्ट आॅफिस नोटामय, 2069 कोटी जमा, चौकशी सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - टपाल कार्यालयात सर्वाधिक बँकिंगचा संबंध सर्वसामान्य व मध्यम वर्गातील नागरिकांचा येतो. त्यामुळे या कार्यालयाला सर्वसामान्यांची बँक म्हणूनही ओळखले जाते. याच सर्वसामान्यांच्या बँकेत नोटाबंदीच्या काळात महाराष्ट्रातील पोस्ट कार्यालयातून तब्बल २ हजार ६९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा विविध खातेदारांमार्फत जमा झालेल्या आहेत.
 
ही माहिती उमरगा तालुक्यातील मुरूम येथील माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल चनशेट्टी यांच्या माहिती अधिकारातील अर्जातून समोर आली अाहे. या कार्यालयातील बड्या रकमा जमा झालेले खातेदार, ठेवीदारांवर इन्कम टॅक्स विभागाने लक्ष केंद्रित केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

केंद्र सरकारने दि.८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० व १ हजार रुपयांच्या चलनी नोटा भारतीय अर्थव्यवस्थेतून रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आणि देशभरात एकच खळबळ उडाली. नागरिकांना त्यांच्याजवळील ५०० व १००० रुपयांच्या नोटा पोस्ट, बँका आदी ठिकाणी जमा करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. वास्तविक पाहता पोस्ट कार्यालयाला सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळखले जाते. बहुतांश गरीब व मध्यमवर्गीयांचेच विविध माध्यमातून पोस्ट कार्यालयात बँकिंग व्यवहार होतात. याच महाराष्ट्रातील पोस्ट कार्यालयांमधून सदरच्या नोटबंदीच्या कालावधीत जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांद्वारे २ हजार ६९ कोटी रुपयांची विक्रमी रक्कम जमा झाली आहे.

यामध्ये ३०९ कोटी रुपयांच्या किमतीच्या ५०० व १ हजार रुपयांच्या जुन्या नोटांची अदलाबदल करण्यात आली आहे, तर १७६० कोटी रुपयांच्या जुन्या चलनी नोटा पोस्टातील विविध खात्यांमध्ये जमा झाल्या आहेत. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल चनशेट्टी यांनी राज्यभरातील पोस्ट कार्यालयांकडे माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीतून हे आकडे समोर आले आहेत. वास्तविक पाहता पोस्ट कार्यालयातील दैनंदिन व्यवहाराच्या तुलनेत या रकमा मोठ्या असल्याने तसेच पोस्टातील अनेकांच्या खात्यामध्येही मोठ्या रकमा जमा झाल्याने ही खाती रडारवर घेत त्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एकूण १२ अर्ज
मुरूम येथील माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल चनशेट्टी यांनी यासंदर्भात माहिती मागविण्यासाठी पहिला अर्ज ९ जानेवारी रोजी पाठविला. तेव्हापासून सर्व विभागीय पोस्ट कार्यालयात एकूण १२ माहिती अधिकाराचे अर्ज देऊन ही माहिती मागवली. यामध्ये अपवादात्मक श्रीरामपूर, धुळे, औरंगाबाद मुख्यालय व औरंगाबाद ही कार्यालये वगळता राज्यभरातील उर्वरित सर्व विभागांनी तसेच उपविभागांनी याबाबतची माहिती दिली आहे.

कार्यालयाचा प्रतिसाद  
माहिती अधिकारांतर्गत माहिती मिळविण्याचा व ती जनहितार्थ खुली करण्याची आवड आहे. याच उद्देशातून राज्यभरातील पोस्ट कार्यालयात नोटाबंदीनंतर एक्स्चेंज व खात्यावर जमा झालेल्या रकमांचा तपशील मागवला होता. याला पोस्ट कार्यालयानेही प्रतिसाद देत आवश्यक माहिती पुरवली. यातून नागरिकांनी घरात अथवा वैयक्तिक स्वत:जवळ साठवून ठेवलेले २ हजार ६९ कोटी रुपये समोर आले.   
- निखिल चनशेट्टी, माहिती अधिकार कार्यकर्ते.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, ३०९ कोटी चलनाची अदलाबदल...
 
बातम्या आणखी आहेत...