आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 22 Officers Got Investigative Letter In The Case Of Tuljabhavani Temple Santha

तुळजाभवानी मंदिर संस्थान गैरव्यवहार प्रकरणी 22 अधिका-यांना चौकशीचे पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील गैरव्यवहाराचे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) प्राथमिक चौकशी अहवालातून चव्हाट्यावर आले. याबाबत दैनिक दिव्य मराठीतून बुधवारी वृत्त प्रकाशित होताच मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी सीआयडीचा तपास अंतिम टप्प्यात असून, 20 वर्षांच्या कालावधीत मंदिर संस्थानवर विश्वस्त म्हणून कार्यरत असणा-या 22 अधिका-यांना चौकशीसाठी पत्र पाठवले आहे.


मंदिराच्या गाभा-यातील सिंहासन दानपेटीतील मौल्यवान वस्तू लंपास केल्याचे प्रकार सीआयडीने केलेल्या तपासातून समोर आले आहेत. या प्रकरणात सीआयडीने 79 जणांच्या साक्ष, तपासण्या नोंदवल्या आहेत. यात मंदिर संस्थानचे कर्मचारी, लिलाव घेणारे साक्षीदार, लिलावात सहभाग घेणारे साक्षीदार यांचा समावेश आहे. वीस वर्षे मंदिर संस्थानच्या कोट्यवधी रुपयांच्या रोख उत्पन्नासह दानपेटीत भाविकांकडून श्रद्धेपोटी अर्पण होणा-या मौल्यवान दागिन्यांची लूट होत असल्याचे समोर आले.

विशेष म्हणजे तुळजाभवानी मंदिर संस्थान हे विश्वस्तांद्वारे चालवले जाते. जिल्हाधिकारी अध्यक्ष असून, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, स्थानिक आमदार, नगराध्यक्ष आदी पदसिद्ध सदस्य आहेत. असे असतानाही ही लूट राजरोस सुरू होती. त्या अनुषंगाने सीआयडीने या वीस वर्षांच्या कालावधीत संस्थानवर प्रशासकीय विश्वस्त म्हणून काम पाहणा-या जिल्हाधिका-यांसह इतर अधिका-यांच्याही चौकशीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. संबंधितांना चौकशीबाबत पत्र काढण्यात आले असून, या पत्रासोबतच सीआयडीला अपेक्षित असणा-या सहा मुद्यांची प्रश्नावली करण्यात आली आहे.

या अधिका-यांची होणार चौकशी
सीआयडीच्या वतीने 20 वर्षांच्या कालावधीत उस्मानाबादेत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आदी पदांवर कार्यरत वरिष्ठ अधिका-यांची चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये संजयकुमार (सध्या संचालक, तंत्रशिक्षण विभाग), राजेशकुमार (आयुक्त ट्रिबल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर), सुरेंद्रकुमार बागडे (खासगी सचिव, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे), एस. चोकलिंगम (नोंदणी महानिरीक्षक), डी. आर. बनसोड (विभागीय आयुक्त अमरावती), आशिष शर्मा (एमडी, महानिर्मिती कंपनी), संजय अग्रवाल (अ‍ॅडव्हायजर, वर्ल्ड बँक साऊथ एशिया), अनिल पवार, एम. एस. देवणीकर (सेवानिवृत्त), शिरीष कारले (सेवानिवृत्त), एम. एल. कोकाटे, सतीश भिंडे, व्ही. एल. देवधर, आर. के. पिंगळे, ए. टी. जोशी, दिलीप बंड, सी. एस. थोरात, आर. बी. बागडे, दिलीप जमादार, बी. आय. केंद्रे, मिताली सेन-गवई, डॉ. प्रवीण गेडाम (जिल्हाधिकारी, सोलापूर) यांचा समावेश असून यापैकी गवई यांचा मृत्यू झाला आहे.

दोषी समोर येतील
20 वर्षांत सर्व अधिकारी प्रकरणात सहभागी होतेच, असे नाही. काहींनी सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केला. काहींनी तक्रारींची दखलही घेतली. परंतु बहुतेकांनी विरोध न करता तसेच निविदा प्रक्रियेवरही सही न करता एक प्रकारे मूक संमतीच दिल्याचे तपासातून समोर येत आहे. त्यामुळे खरे दोषी कोण हे चौकशीअंतीच समोर येईल.