आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर, रावसाहेब दानवे यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- जालना शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आठवडाभरात या रस्त्यांचे सर्वेक्षण करून पुढील प्रक्रियेस सुरुवात केली जाणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यातील बहुतांश रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे केले जाणार आहेत. शिवाय पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या कडेला सिमेंट नाल्या प्रस्तावीत केल्या जाणार असल्याचे खासदार दानवे यांनी सांगितले.

शहरातील प्रमुख अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी पुढे येत आहेे. जालनेकरांची ही मागणी पूर्ण करण्यासाठीच आठवडाभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात शहरातील खराब रस्ते दुरुस्ती करण्यासंदर्भात प्राथमिक माहिती घेतली.

त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. याच बैठकीत वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी या कामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे खासदार रावसाहेब दानवे
यांनी सांगितले.

या रस्त्यांच्या कामांना तातडीने सुरुवात करता यावी यासाठी पुढील आठवड्यात खासगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच पुढील प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याचे खासदार दानवे यांनी सांगितले. यासाठी शहरातील प्रमुख ९ मार्गांची निवड केली आहे. हे काम करताना डांबरीकरणाऐवजी प्रामुख्याने सिमेंट-काँक्रीटमध्ये रस्ते तयार करण्यासाठी प्राधान्य राहणार असल्याचेही दानवे यांनी सांगितले.

शहरातील या रस्त्यांची कामे होणार
- मामा चौक जुना मोंढा
- मामा चौक ते महावीर चौक
- महावीर चौक ते पाणी वेस
- पाणी वेस ते शिवाजी पुतळा
- मंमादेवी ते शिवाजी पुतळा
- गांधी चमन ते मोतीबाग
- शिवाजी पुतळा ते टांगा स्टँड
- टांगा स्टँड ते भोकरदन नाका
Á भोकरदन नाका ते बालाजी चौक

साइड ड्रेनेजची केली जाणार व्यवस्था
पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने शहरातील रस्ते लवकर खराब होतात. त्यामुळे नव्याने रस्ते तयार करताना पाण्याचा निचरा होण्यासाठी साइड ड्रेनेज तयार केले जाणार आहे. हे ड्रेनेज कशा प्रकारे असे असेल याचाही प्रस्ताव सर्वे करणारी एजन्सी देणार आहे, असेही खासदार दानवे या वेळी म्हणाले.