आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडीच हजार फोटो, कागदपत्रे गहाळ; आता छायाचित्र अपलोडिंगसाठी लाभार्थींची लूट!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- जालना शहरात तेरा हजार नवीन शौचालये झाली आहेत. दरम्यान, फोटो, अर्ज गहाळ झाल्यामुळे अडीच हजार लाभार्थींचे छायाचित्र स्वच्छ भारत मिशनच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बाकी आहे. यामुळे तयार झालेले शौचालय आणि काम पूर्ण झालेल्या नोंदीत तफावत आहे. यामुळे पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी नेमून दिलेल्या नागरिकांमार्फत शौचालयांचे जीपीएसआधारे शौचालयांचे फोटो काढण्याचे काम सुरू आहे, परंतु काहीजण नागरिकांची दिशाभूल करुन स्वच्छतागृहांचे काम झाल्यामुळे नव्याने अनुदानाचा पाचवा टप्पा येणार असल्याचे आमिष दाखवून लाभार्थींकडून १०० ते ५०० रुपये घेऊन त्यांची आर्थिक लूट करीत आहेत. 

    
राज्यभरातील संपूर्ण शहरे पाणंदमुक्त करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरुन आहेत. याअनुषंगाने उघड्यावर जाणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन त्यांना नोटिसा देऊन शौचालय बांधून घेण्याचे आवाहन करीत आहेत. दरम्यान, जालना शहरात अगोदरच ६५ हजार शौचालये आहेत. परंतु काही भागात अजूनही उघड्यावर जात असल्याचा सर्व्हे करून अजून तेरा हजार शौचालयाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टानुसार सात हजार शौचालयांचे बांधकामही पूर्ण झाले आहे. परंतु स्वच्छता भारत मिशनच्या संकेतस्थळावर बांधकामांचे छायाचित्र अपलोड न झाल्यामुळे प्रत्यक्ष काम आणि छायाचित्र अपलोड न होण्याने तफावत दिसत आहे. दरम्यान, मध्यंतरी स्वच्छता समितीने येऊन पाहणी केली. याबाबत पालिकेला सूचनाही केल्या आहेत. दरम्यान, शासनाकडून ज्या पाणंदमुक्ती झाली नाही तर त्या जिल्ह्याची गोपनीय अहवालात त्या कामाची नोंद घेऊन मूल्यमापनही केले जात असल्याच्या सूचना आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण केल्याची आकडेवारी पद्धतशीरपणे वाढविली. मात्र पूर्ण बांधकाम झालेल्या शौचालयांची छायाचित्रे संकेतस्थळावर आली नसल्याने मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. परिणामी काम खरेच पूर्ण झाले का, असा प्रश्न निर्माण होत आहे. जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात छायाचित्र संकेतस्थळावर जोडण्यापासून राहिलेले आहे.    

 

निवेदन देणार 
अगोदरच सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. माहितीअभावी या नागरिकांना लुटल्या जात आहे. आमच्याकडेही पैशाची मागणी झाली. परंतु आम्ही पैसे दिले नाही. या लोकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे प्रभाकर आहेर, विजय कसबे, अनिल खंडागळे यांनी सांगितले.


१०० टक्के अपलोड    
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बेसलाइन यादीतील २ लाख शौचालयांचे छायाचित्र १०० टक्के स्वच्छ भारत मिशनच्या संकेतस्थळावर अपलोड झाले. यात जालना, बदनापूर, अंबड, जाफराबाद, परतूर, मंठा, घनसावंगी या तालुक्यांचा समावेश येतो.   


१५० रुपये घेतले    
शौचालयाचा पाचवा टप्पा येणार असल्याचे सांगून शौचालयाचा फोटो काढून घेत १५० रुपयांची मागणी केली. रकमेबाबत विचारणा केली असता, फोटो धुवावे लागत असल्याचे जुन्या जालन्यातील उत्तम गायकवाड यांनी सांगितले.     


पुढे काय    
कुणी चुकीची माहिती देऊन पैसे मागत असेल तर त्याची शूटिंग, फोटो काढून मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या व्हॉट्सअॅप ८२७५२७४३६९ या नंबरवर पाठवा.

 

नागरिकांनी केल्या तक्रारी    
शौचालयांचे फोटाे काढून येणारा पाचवा टप्पा देण्यात येणार असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. याबाबत पालिकेला माहिती देण्यात आली आहे. चुकीची माहिती देऊन नागरिकांची आर्थिक लूट होत आहे.    
- ज्ञानेश्वर ढोबळे, नगरसेवक, जालना.    


आदेशानुसार मोहीम    
वरिष्ठांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविली जात आहे. परंतु फोटो अपलोडिंगसाठी नागरिकांकडून पैसे घेणे चुकीचे आहे. दोन ते अडीच हजार शौचालयांचे अपलोडिंग करणे बाकी आहे.    
- डी. वाय. लोंढे, स्वच्छता निरीक्षक, न.प. जालना.    


कारवाई करतो    
पैसे घेत असल्याबाबत माहिती घेऊन कारवाई करतो.छायाचित्र अपलोडिंग करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, न.प.जालना.  

बातम्या आणखी आहेत...