आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 25 Thousand Villages To Be Free From Shortage Within Five Years

पाच वर्षांत २५ हजार गावे टंचाईमुक्त होतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - सतत दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी येणा-या पाच वर्षांत प्रतिवर्ष पाच हजार गावांनुसार सुमारे २५ हजार गावांत जलयुक्त शिवार अभियान राबवून ही गावे टंचाईमुक्त केली जाणार आहेत. या योजनेचा शुभारंभ बीड तालुक्यातील खंडाळा येथून होणार असल्याची माहिती जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

राज्यात वारंवार पावसाच्या कमी-अधिक प्रमाणामुळे टंचाई स्थितीला सामोरे जावे लागते. राज्यातील सर्व गावे जलयुक्त होण्यासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान’ राबवण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या वर्षात राज्यातील पाच हजार गावे टंचाईमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रति वर्ष पाच हजार गावे निवडून पाच वर्षांत २५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा संकल्प जलसंधारणमंत्री मुंडे यांनी केला. यासंदर्भात औरंगाबाद, नाशिक, कोकण, पुणे, अमरावती, नागपूर विभागातील आयुक्त आणि जिल्हाधिका-यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यात टंचाईचा आढावा घेत योजनेसाठी गावांच्या निवडी करून प्रजासत्ताकदिनी एकाच वेळी राज्यभरात योजनेच्या कामास प्रारंभ करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाडा व विदर्भात टंचाई
काही वर्षांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भ आदी विभागांची पाणीटंचाई परिस्थिती गंभीर आहे. हे चित्र बदलण्यासाठी जलसंधारण विभागामार्फत व्यापक प्रयत्न केले जाणार आहेत. शेतीसाठी आणि पिण्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करणे हे जलयुक्त शिवार अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. गावागावांत जलसंधारणाचे छोटे-छोटे प्रकल्प उभे करून गावपातळीवरच पाणी अडवून आणि ते जमिनीत जिरवून भूगर्भातील पाणीसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्या म्हणाल्या.