आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर ५ वर्षांत २५० बळी, पुन्हा दोघांनी गमावले प्राण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना येथील अंबड चौफुलीनजीक रस्त्यावरील अपघातात मोडतोड झालेली दुचाकी.  छाया : नागेश बेनीवाल - Divya Marathi
जालना येथील अंबड चौफुलीनजीक रस्त्यावरील अपघातात मोडतोड झालेली दुचाकी.  छाया : नागेश बेनीवाल
जालना - आघाडी सरकारच्या काळात मंजूर जालना-वडीगोद्री रस्त्याचे चौपदरीकरण विद्यमान युती सरकारने तांत्रिक मुद्दे पुढे करून रद्द केले. दरम्यान, अत्यंत खराब झालेल्या रस्त्यावर अपघातांची शृंखला सुरूच असून या रस्त्यावर अातापर्यंत ५ वर्षांत जवळपास २५० निष्पाप बळी गेले आहेत. शनिवारी सकाळी १०.१५ वाजता अंबड चौफुलीपासून हाकेच्या अंतरावर ट्रकच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले, तर एक जण जखमी आहे. त्यामुळे या रस्त्यावर आणखी किती बळी गेल्यावर सरकार चौपदरीकरणाचे काम हाती घेणार, असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जातोय.

अर्जुन वाहूळ, केशव पारे व जमील खान हे तिघे दुचाकीवरून (एमएच २१ एएम ९८४८) अंबडकडून जालन्याकडे येत होते. या वेळी अंबड चौफुलीजवळ पांगारकरनगर येथे अज्ञात ट्रकचालकाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात जबर मार लागल्याने अर्जुन वाहूळ (६५, सिरसवाडी, ता.जि.जालना) व केशव पारे (अफगाण मोहल्ला, जालना) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी जमील यास उपचारासाठी प्रथम जालना येथील जिल्हा रुग्णालय व त्यानंतर औरंगाबाद घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

वारकऱ्यांचा जीव गेल्यानंतर अाली हाेती सरकारला जाग
शेगाव येथील गजानन महाराजांची पालखी दिंडी पंढरपूरहून परत जाताना अंबड तालुक्यातील पारनेर फाट्यावर २५ जुलै २०११ रोजी भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे १४ वारकऱ्यांचा चिरडून मृत्यू झाला होता, तर अनेक वारकरी यात जखमी झाले होते.
याची गंभीर दखल घेऊन २१ नोव्हेंबर २०१२ रोजी जालना-अंबड-वडीगोद्री या ४६.६ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता. दरम्यान, २८ मार्च २०१३ रोजी १७८.५० कोटी रुपये खर्चास मान्यता दिली होती, तर ३ सप्टेंबर २०१४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीने ३४४ कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली होती. शिवाय इंदूर येथील के. टी. कन्स्ट्रक्शन कंपनीला हे कामही मिळाले होते.

पुढील ३० वर्षे पथकर आकारून हा खर्च भागवला जाणार होता. कार्यारंभ आदेशानंतर १८ महिन्यांत काम करण्याचे नियोजन होते. त्यानंतर तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार राजेश टोपे यांनी ७ सप्टेंबर २०१४ रोजी अंबड येथे चौपदरीकरण कामाचे मोठ्या थाटात भूमिपूजन केले होते. मात्र, काहीच दिवसांनी राज्यात सत्तांतर झाले आणि नव्याने सत्तेवर आलेल्या युती सरकारने तांत्रिक मुद्दे उपस्थित करत रस्त्याचे चौपदरीकरण रद्द
करून टाकले.

इथे अडले घोडे
जालना-वडीगोद्री रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला मंजुरी देताना अर्थखात्याची मंजुरी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. आता अर्थखात्याची मंजुरी घेऊन या रस्त्याच्या कामाला पुन्हा मंजुरी दिली जाईल, असे सत्ताधारी पक्षातील नेते सांगत आहेत.

डागडुजीत २५ लाख
वाहनांची वर्दळ व अरुंद व खड्डेमय झालेल्या या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजीचा निर्णय घेण्यात आला. ५ जानेवारी २०१५ रोजी दुरुस्तीचे टेंडर काढून २४ लाख ८५ हजार खर्च केले. थातूरमातूर दुरुस्ती करून डोळ्यात जणू धूळफेक करण्यात आली.

शिफारस, तरी जैसे थे
२५ जुलै २०११ रोजी वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यावर नियुक्त चौकशी समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश ज्ञा.ना. भरगंडे यांनी दिंडी मार्गाच्या रुंदीकरणाची शिफारस केली होती. ५ वर्षे उलटली तरी चौपदरीकरण कामाला मुहूर्त नाही.

हिंगोलीजवळ अपघातात एक ठार
हिंगोली |येथून १० किमी अंतरावरील कलगाव ढाब्याजवळ शनिवारी मिनी टेम्पोने ऑटोला मागून धडक दिल्याने ऑटोतील धनाजीराव मांदळे (५६) ठार, तर सुभाना खडसे (४२) आणि इंदुबाई कंकाळ (३७) हे दोघे शेतकरी गंभीर जखमी झाले.

नांदेडातही एक तरुणी ठार
नांदेड | शहरातील काबरानगरात मोर चौक ते छत्रपती चौकादरम्यान शनिवारी वाळूच्या टिप्परने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने तरुणी ठार झाली. मृत तरुणी १८-१९ वयोगटातील आहे. मृत तरुणीची सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती.

किती बळी घेणार?
सरकार आणखी किती निष्पाप लोकांचे बळी घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. या कामास तातडीने मंजुरी देऊन काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करू.
-राजेश टोपे, आमदार, अंबड-घनसावंगी
वाहनांची संख्या वाढली
या मार्गावर छोट्या वाहनांसह जड वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. मात्र, रस्ता अरुंद असून त्यावर खड्डे पडलेले आहे. यामुळे वाहन चालवणे अवघड झाले असून अपघात वाढले आहेत.
-शशिकांत घुगे, नगरसेवक, जालना
लवकरच काम सुरू
या कामाला तत्कालीन आघाडी सरकारने मंजुरी घेतली नव्हती. शिवाय टेंडर झाले नाही, वर्क ऑर्डरही नव्हती, त्यामुळे हे काम रद्द करण्याचा प्रश्न येतोच कुठे? मी त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो आहे. हे काम शंभर टक्के लवकरच सुरू होईल.
-बबनराव लोणीकर, पालकमंत्री
बातम्या आणखी आहेत...