आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गायब झालेल्या २,६७५ एमबी कार्यालयात झाल्या दाखल, अद्याप ६६६ एमबी बेपत्ताच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - सार्वजनिक बांधकाम विभागातील महत्त्वाचा दस्तावेज असलेल्या एमबी गहाळ प्रकरणातील वेगवेगळे किस्से आता समोर येऊ लागले आहेत. गायब झालेल्या एमबी प्रकरणात बांधकाम विभागाने लोकल दैनिकात जाहिरात देऊन आठ दिवसांत एमबी जमा न केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे वर्षानुवर्षे बापजाद्यांची जहागिरी असल्याप्रमाणे एमबी स्वत:कडे ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. अवघ्या आठ ते दहा दिवसांत गायब असलेल्या ३ हजार ३४१ पैकी २ हजार ६७५ एमबी परत स्वगृही म्हणजेच बांधकाम विभागाकडे जमा झाल्या आहेत. आणखी ६६६ एमबी गायब असल्या तरी जमा झालेल्या बहुतांश एमबी अधिकाऱ्यांकडेच निघाल्याने यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न समोर येऊ लागला आहे.

दीड महिन्यापूर्वी मुंबईच्या एका रेस्टहाऊसच्या खोलीतून बांधकाम विभागाच्या महत्त्वाच्या आणि शेकडो कोटी रुपयांच्या कामांची नोंद असलेल्या १०० एमबी बेवारस अवस्थेत आढळून आल्या आणि राज्यभरातील बांधकाम विभागातील कारभाराचा नमुना नवीन शासनकर्त्यांसमोर आला. याप्रकरणी तत्काळ हालचाली होऊन राज्यभरात किती एमबीचे रेकॉर्ड शासकीय दप्तरी नाही, याची माहिती घेण्याचे आदेश झाले. यामध्ये मराठवाड्याची जबाबदारी प्रभारी मुख्य अभियंता एकनाथ उगले यांच्याकडे देण्यात आली. त्यानुसार काढलेल्या माहितीतून उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल ३३४१ एमबी गायब असल्याचे समोर आले. या प्रकाराकडे एरव्ही दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही कारवाईच्या धास्तीने घाम फुटला.

११०० मोठ्या एमबी
उस्मानाबाद विभागांतर्गत जानेवारी २००० ते मार्च २०१५ पर्यंतच्या एकूण ३,३४१ एमबी गायब असल्याचे पाहणीतून समोर आले. यामध्ये लहान एमबींची संख्या १,१०० तर मोठ्या एमबींची संख्या २,२४१ इतकी होती. वर्षानुवर्षे कार्यालयाबाहेरच अनधिकृतपणे राहणाऱ्या महत्त्वाच्या दस्ताऐवजाबाबत कोणालाच गांभीर्य नसल्याचे यातून समोर आले. आता कारवाईचा बडगा मानेवर असल्याने वृत्तपत्रांत जाहिरात देण्यात आली. यातून ८५० लहान एमबी व १,८२५ मोठ्या एमबी कार्यालयात परत जमा झाल्या.

एमबी अधिकाऱ्यांकडेच
एमबी (मोजमाप पुस्तिका) ही काेणत्याही कामाची कुंडलीच असते. यामध्येच प्रत्यक्षात काम किती झाले, त्यानुसार कंत्राटदाराचे देयक, कामाचे मोजमाप, अशा कामासंदर्भातील तांत्रिक गोष्टी यामध्ये नोंदविल्या जातात. वास्तविक पाहता या मोजमाप पुस्तिका कामादरम्यान कार्यालयातून अभियंत्याकडून घेतल्या जातात. नंतर या पुस्तिका काम संपल्यावर जमा करणे अपेक्षित असताना त्या वर्षानुवर्षे अभियंत्याकडेच राहतात. यातून गैरप्रकाराला, गैरकारभारालाही मोठा वाव आहे.
बातम्या आणखी आहेत...