आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना मतदारसंघातील यादीत केवळ 28 % मतदारांचे फोटो अपलोड, दोषी कर्मचारी निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - फोटो अपलोड करून मतदार याद्या अद्यावत करण्याच्या सूचना तसेच कार्यवाहीचा इशारा देऊनही जिल्ह्यात केवळ 28.8 टक्केच काम झाले. यामुळे संतप्त झालेल्या जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी हलगर्जीपणा करणा-या 31 कर्मचा-यांना तडकाफडकी निलंबित केले. सामाजिक न्याय भवनात मंगळवारी झालेल्या जालना विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत त्यांनी हे फर्मान सोडले.


मतदार यद्या अद्यावत करणे हा राष्‍ट्रीय कार्यक्रम आहे. मात्र, असे असमाना काम वेळेत पूर्ण का होऊ शकले नाही, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. ही कामे 30 जूनपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले होते. शिवाय, जालनाचे उपविभागीय अधिकारी पी. एल. सोरमारे व परतूरचे उपविभागीय अधिकारी राजू नंदकर यांच्यासह आठही तहसिलदारांना जिल्हाधिका-यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. जिल्ह्यातील एक लाख 89 हजार 727 नागरिकांची नावे मतदार यादीत आहेत. महिनाभरात केवळ 53 हजार 279 मतदारांचेच फोटो अपलोड करण्यात आले. 28.8 टक्के काम झाल्यामुळे जिल्हाधिका-यांनी जालन्यापासूनच कारवाईचा बडगा उचलला आहे.


धिम्यागतीचा खुलासा दूरच, वाचला केवळ तक्रारींचा पाढा
जालना विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे फोटो अपलोड करण्यासंदर्भातील आढावा बैठकीत जिल्हाधिकारी देशपांडे, जिल्हा उपनिबंधक अशोक खरात, उपमुख्यकार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, शिक्षणाधिकारी रामदास शेवाळे, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे आदींची उपस्थिती होती. 31 कर्मचा-यांनी मतदार फोटो अपलोड करण्यात दिरंगाई केली. परिणामी मतदार याद्या अद्यावत होऊ शकल्या नाहीत, हे बैठकीत समोर आले.यावर कर्मचा-यांनीही तक्रारींचा पाऊस पाडला. मात्र, जिल्हाधिका-यांनी गंभीर दखल घेत 31 कर्मचा-यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश सोडले.


सात विभागांतील कर्मचा-यांचा समावेश
जालना नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरण, पशुसंर्वधर्न आणि भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. मंगळवारी हे आदेश तयार झाले असून बुधवारी संबंधितांना पाठवले जाणार आहेत.


फोटो अपलोड करण्याच्या जबाबदारीचे त्रांगडे कायम !
निलंबन कालावधीत कर्मचा-यांनी कुठे काम करायचे ? पालिकेतील आठ शिक्षकांचा समावेश असल्यामुळे संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे काय ? निलंबन किती कालावधीपर्यंत ? निलंबन काळात वेतन मिळणार की नाही ? मिळणार असेल तर किती ? याहीपेक्षा उर्वरीत मतदारांचे फोटो अपलोड करण्याची जबाबदारी कोणावर सोपवणार ? या प्रश्नांची उत्तरे मात्र जिल्हाधिकारी देऊ शकले नाहीत.


फोटोचा लेखाजोखा
तालुका फोटो नाही फोटो अपलोड
परतूर 12215 5235
मंठा 17224 3810
घनसावंगी 19898 6468
अंबड 19258 5311
जालना 72264 15760
बदनापूर 14325 5081
भोकरदन 25761 7357
जाफराबाद 8782 4257
एकूण 189727 53279


यांच्यावर कोसळली कु-हाड
सात शिक्षिका, 16 लिपिक, 5 बिल कलेक्टर, एक शिक्षक, भंडारपाल, उद्याननिरीक्षक अशा एकूण 31 कर्मचा-यांवर निलंबनाची कु-हाड कोसळली आहे. मंगळवारी दिवसभर याच विषयाची चर्चा सुरू होती.