आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात शॉक लागून तिघांचा मृत्यू, 12 तासांतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केशव डोंगरे - Divya Marathi
केशव डोंगरे
बीड- शेतात पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बीड तालुक्यातील वानगाव येथे, तर वीज उपकेंद्रात दुरुस्तीचे काम  करताना विजेचा धक्का बसल्याने खासगी ऑपरेटरचा मृत्यू झाल्याची घटना बीड तालुक्यातील घाटसावळी येथे घडली. 
 
तर केज तालुक्यातील  टाकळी येथे कोळप्याला अडकलेले वायर काढताना  विजेचा धक्का बसून  मुलाचा मृत्यू तर वडील  गंभीर जखमी झाले. जखमी वडिलांवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तीनही घटना १२ तासांत घडल्याने शनिवार बीडकरांसाठी काळा दिवस ठरला आहे.   
 
बीड तालुक्यातील वानगाव येथील तरुण शेतकरी अमोल अनंता जोगदंड (वय ३२)  हा   शनिवारी सकाळी शेतात पाणी आणण्यासाठी गेला होता. दोन खेपा आणल्यानंतर  तिसऱ्या खेपेला तो परत आलाच नाही. विजेच्या धक्क्याने त्याचा शेतात  मृत्यू  झाला. सदरील शेतकऱ्याने मांजरसुंबा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतून एक लाख ३० हजारांचे कर्ज घेतले होते. अमोल जोगदंड याला दोन एकर शेती होती. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. विद्युत उपकेंद्रात वीज दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का बसल्याने  खासगी ऑपरेटरचा मृत्यू झाल्याची घटना बीड तालुक्यातील घाटसावळी येथे शनिवारी सकाळी घडली.  केशव शंकर डोंगरे (रा. खडकी देवळा) हे घाटसावळी येथील वीज उपकेंद्रात कंत्राटी तत्त्वावर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते.

शनिवारी सकाळी उपकेंद्रातून झालेला बिघाड दुरुस्त करत असताना  केशव डोंगरे यांना विजेचा जोरदार धक्का बसला. नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात अाले. या प्रकरणी पोलिसांत अाकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजेच्या धक्क्याची तिसरी घटना केज तालुक्यातील टाकळी येथे घडली. टाकळी येथील सखाराम भाऊराव घुले ( वय ५५) व भीमराव घुले ( वय २४ ) हे दोघे बापलेक शनिवारी सकाळी अकरा वाजता शेतातील कपाशीला कोळपणी करीत होते. याचवेळी शेतातून गेलेले विजेचे वायर औताला अडकले. ते वायर काढीत असताना त्यांना विजेचा शॉक बसल्याने भीमराव घुले या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे वडील सखाराम घुले हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

तार पकडून आत्महत्या केल्याची चर्चा   
बीड तालुक्यातील येथील तरुण  शेतकरी अमोल जोगदंड याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातून जाणाऱ्या विद्युत तारेला स्पर्श करून आत्महत्या केल्याची चर्चा दिवसभर बीड तालुक्यात सुरू होती. परंतु याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात मात्र शनिवारी रात्रीपर्यंत तशा प्रकारची नोंद नव्हती.
बातम्या आणखी आहेत...