आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या मृत्यूचा धक्का; गर्भवती आईचाही मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - पहाटेच्यावेळी झोपेत असलेल्या तीन वर्षांच्या मुलीला अचानक उलट्या होऊन तिचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने काही वेळातच गर्भवती मातेनेही प्राण सोडल्याची घटना केज तालुक्यातील घाटेवाडी येथे गुरुवारी सकाळी सात वाजता घडली. अक्कुबाई शहादेव देवगुडे (३५) पूजा देवगुडे (३) अशी मृत माय-लेकींची नावे आहेत.

केज तालुक्यातील घाटेवाडी येथे शहादेव देवगुडे हे कुटुंबासह राहतात. गुरुवारी पहाटे तीन वाजता त्यांची तीन वर्षांची मुलगी पूजाला अचानक चक्कर येऊन उलट्या झाल्या. यात तिची प्रकृती बिघडली. गावात डॉक्टर नाही. दुसऱ्या गावात उपचारासाठी वाहनाची व्यवस्था नाही. दरम्यान, मुलीला सकाळी दुसऱ्या गावात डॉक्टरांकडे नेण्याचा निर्णय देवगुडे कुटुंबाने घेतला. मात्र, पहाटे पाच वाजता पूजाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती तिची गर्भवती आई अक्कुबाई शहादेव देवगुडे हिला कळताच तिला धक्का बसला. तिच्याही पोटात कळा निघू लागल्या आणि मुलीच्या विरहाने अक्कुबाई बेशुद्ध झाल्या. उपचारासाठी कुटुंबातील लोकांनी तिला तातडीने नेकनूर येथील महिला रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी परवीन बेग यांनी तपासणी करून अक्कुबाईला मृत घोषित केले. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून उत्तरीय तपासणीसाठी महिलेचा मृतदेह नेकनूर येथील पोलिस जमादार संजय फड यांनी सकाळी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात नेला. उत्तरीय तपासणीनंतर अक्कुबाईचे वडील सखाराम यादव यांच्या ताब्यात तिचा मृतदेह देण्यात आला.

मुलीचे मातृछत्र हरवले
घाटेवाडीयेथील शहादेव देवगुडे हे गावात शेती करतात. काही वर्षांपूर्वी त्यांचा विवाह केज तालुक्यातील विरंगुळवाडी येथील अक्कुबाईबरोबर झाला होता. सुरुवातीला त्यांना एक मुलगी झाली. तिचे नाव काजल असून सध्या ती पाच वर्षांची आहे. त्यानंतर त्यांना पूजा ही दुसरी मुलगी झाली. परंतु दुर्दैवाने तिचा मृत्यू झाल्यानंतर अाईचाही मृत्यु झाल्याने पूजाचे मातृछत्र हरवले.

अक्कुबाई देवगुडी ही नऊ महिन्यांची गरोदर
घाटेवाडीयेथील अक्कुबाई शहादेव देवगुडे ही नऊ महिन्यांची गरोदर होती. गुरुवारी पहाटे तिच्या मुलीचा मृत्यू झाल्याने विरहाने तिनेही काही वेळात प्राण सोडले. देवगुडे कुटुंबाला एकाच दिवशी मुलगी, आई गर्भातील बाळ अशा तीन जणांना गमवावे लागले. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेने घाटेवाडीकरांचे मन सुन्न झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...