आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकारांकडील 30 एकर शेतकऱ्यांना परत मिळणार; तुळजापूर तालुक्यातील 3, करमाळातील 1 प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 उस्मानाबाद: सावकारांनी बेकायदेशीररीत्या गिळंकृत केलेल्या चार ठिकाणच्या जमिनी परत करण्याची कारवाई जिल्हा उपनिबंधक के. बी. वाबळे यांनी केली आहे. तुळजापूर तालुक्यातील तीन तर करमाळा तालुक्यातील एका ठिकाणच्या सावकारांकडून २९ एकर ३७ गुंठे जमीन संबंधित शेतकऱ्यांना परत मिळणार आहे. यासंदर्भात रीतसर सुनावणी घेऊन सावकारांनाही बाजू मांडण्याची संधी देण्यात आली.   
 
गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, नापिकी आदी कारणांमुळे शेतकऱ्यांची झोळी रिकामी राहिली आहे. त्यांना विवाह, रुग्णालयातील उपचार, दैनंदिन गरजा यासह लहानसहान कारणांसाठी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागले आहेत. गरज असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेती सावकारांना तारण दिली. यासाठी अनेकांनी थेट कायदेशीर खरेदीखतही करून दिले आहे. याचा फायदा घेत काही ठिकाणी घेतलेल्या कर्जापेक्षा अधिक व्याज वसूल करूनही शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचे प्रकार घडले आहेत. जिवापाड जपलेला, वाडवडिलांपासून मिळालेला जमिनीचा तुकडा डोळ्यादेखत सावकार हिसकावून घेत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आता महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ हा कायदा अशा शेतकऱ्यांना आधार देणारा ठरत आहे. या कायद्याच्या बळावर चार प्रकरणात २९ एकर ३७ गुंठे जमीन परत करता येणार आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक के. बी. वाबळे यांनी सुनावणी घेऊन ही कारवाई केली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
  
चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथील कुंपाबाई भैरू माटे यांचे पती भैरू यांनी अवैध सावकारी करणारे होर्टी येथील दयानंद गुळवे, भारतबाई नकाते व राजकुमार गुळवे या सावकारांकडून दोन लाख ७९ हजार रुपये घेतले होते. यापोटी त्यांनी राजकुमार यांच्या नावे आपल्या १२ एकर एक गुंठे जमिनीचे खरेदीखत करून दिले होते. कर्जाची परतफेड करूनही सावकार शेतकऱ्यांना जमीन देण्यास टाळाटाळ करत होते. अशाच पद्धतीने या सावकारांनी सात जणांना कर्ज दिले होते. 
 
करार असूनही दुरुपयोग 
शहापूर (ता. तुळजापूर) येथील शेतकऱ्याला जमीन परत करण्याचा करार असूनही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जाकीर हुसेन पटेल यांनी सुरय्या सलीम पटेल, सलीममियाँ पटेल यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. यासाठी दाेघांनी जाकीर हुसेन यांच्याकडून चार एकर जमीन तारण घेतली. तसेच तीन वर्षांनी दोन लाख दिल्यावर जमीन परत करण्याचा करारही केला. मात्र, परतफेड करूनही त्यांची फसवणूक झाल्याचे समाेर आले. यामुळे ही जमीन परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे.   
 
सावकारीची स्थिती
४९५ तक्रारी सावकारीच्या जिल्ह्यात
२९  प्रकरणांत सुनावणी   
१३  प्रकरणांत सावकारी सिद्ध   
६० एकर जमीन परत करण्याचे आदेश
 
३० हजारांसाठी तीन एकर   
आवडाबाई लक्ष्मण शेलार (रा. भोत्रा, ता. परंडा) यांना ३० हजार रुपयांची गरज होती. त्यांनी नेर्ले (ता. करमाळा) येथील शहाजी पाटील यांच्याकडून पैसे घेऊन भोत्रा येथील तीन एकर एक गुंठे जमीन तारण घेतली. ठरल्याप्रमाणे ४५ हजार परत करूनही जमीन परत दिली नाही. सहकार अधिकाऱ्यांच्या चौकशीत हा व्यवहार सावकारकीचा असल्याचे समोरही आले. यासंदर्भात शेलार यांनी पाटील यांच्या वारसांच्या विरोधात तक्रार दिली होती. याप्रकरणीही जमीन परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.   
बातम्या आणखी आहेत...