आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार गावांतील ३० महिलांनी केली गृहउद्योगाला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- पुरुषांप्रमाणेच महिलांमध्येही उद्योग, व्यवसाय उभारण्याची क्षमता आहे. शहरी भागात अनेक महिला सक्षमपणे विविध उद्योग चालवतात. त्यांच्याप्रमाणेच ग्रामीण महिलांनाही विविध गृह उद्योगांची माहिती व संधी मिळावी, यासाठी खरपुडीच्या कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिकत असलेल्या कृषिकन्या जागृती करत आहेत. चार वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे अनेक गावांतील महिलांना गृहउद्योग सुरू करण्यास बळ मिळाले आहे.

खरपुडी येथील कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही अनेक उपक्रम राबविले जातात. यंदा विद्यार्थी, विद्यार्थिनींना गटागटानुसार जिल्ह्यातील काही गावे वाटप करून देण्यात आली आहे. हे विद्यार्थी त्यांना सांगितलेल्या गावात जाऊन तेथील ग्रामस्थांना लागवड, बहारनिहाय पीक, कीडरोग व पिकाची काळजी तसेच कृषीक्षेत्राशी निगडित मार्गदर्शन करतात. सध्या महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या ५१ विद्यार्थिनी म्हणजेच कृषिकन्या प्रत्यक्ष स्थळावर जाऊन त्या त्या ठिकाणच्या महिलांना घरगुती व्यवसायाचे महत्त्व पटवून देतात. हा त्यांच्या पाठ्यक्रमातील एक भाग आहे. दैनंदिन कामकाजासोबतच महिलांनी फावल्या वेळेत दोन-चार घंटे काम केल्यास त्या गृहउद्योग उत्तमपणे चालवू शकतात. त्यासाठी सुरुवात कशी करायची, याचे मार्गदर्शन या कृषिकन्या करत आहेत. सध्या हा उपक्रम जालना तालुक्यातील विविध गावांत राबविण्यात येत आहे. आगामी काळात प्रत्येक गावात १०० महिला स्वयंरोजगार बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी योगिता मोहिते, सारिका भापकर, उत्कर्षा शिंदे, जयश्री लहाने, श्वेता कसबे, रोहिणी गायकवाड, लता डोभाळे, मनीषा ढोबाळे, अक्षय्या गुजुला, उमाराणी मंकगोणे, श्रुती दंडारे या परिश्रम घेत आहेत.

या गावातील महिलांनी सुरू केला गृहउद्योग
जानेवारी २०१४ पासून खरपुडी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जालना तालुक्यातील विविध गावांत जाऊन महिलांना स्वयंरोजगाराविषयी माहिती दिली. तसेच दैनंदिन कामासोबतच सहजपणे व्यवसाय करणे कसे शक्य आहे, यासाठी इतर महिलांनाही यात कसे सहभागी करून घेता येईल, हे महिलांना पटवून दिले. यातून सध्या कारला, हातवण, मठपिंपळगाव, गोलापांगरी, खरपुडी या गावांतील ३० ते ४० महिलांनी व्यवसाय सुरू केले आहेत.

कृषिकन्या करताहेत या उद्योगांबाबत मार्गदर्शन
खरपुडी येथील कृषिकन्यांकडून दरवर्षी विविध लघु व्यवसायावर मार्गदर्शन करण्यासाठी पाच विद्यार्थिनींना एक गाव ठरवून दिले जाते. या विद्यार्थिनी नियमितपणे गावागावात जाऊन महिलांना लाेणचे बनविणे, बीजप्रक्रिया, पापड तयार करणे, मसाले बनविणे, विविध पदार्थ, शेवया बनविणे, घरगुती उन्हाळी खाद्यपदार्थ तयार करून विकणे यासह विविध प्रकारच्या गृहउद्योगांबाबत मार्गदर्शन करतात. हा त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग आहे.

व्यवसायातून ग्रामीण भागात येईल समृद्धी
कृषिकन्यांना काही गावे वाटप करून दिली असून तेथील महिलांना स्वयंरोजगाराचे महत्त्व पटवून सांगितले जाते. सध्या ५१ कृषिकन्या ग्रामीण महिलांना रोजगार सुरू करण्याची प्रेरणा देत आहेत.
-डॉ. ओ. डी. कोहिरे, प्राचार्य, कृषी विज्ञान केंद्र खरपुडी.