आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत ३२ मुस्लिम जोडप्यांचा विवाह, ईद-ए-मिलादला सामुदायिक विवाह सोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - ईद-ए-मिलादचे औचित्य साधून ३० वर्षांपासून सुरू असलेली सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा येथील रोशनखान मोहल्ला बारादरीने याही वर्षी अव्याहतपणे जपली आहे. सोमवारी (दि.१२) झालेल्या सोहळ्यात ३२ मुस्लिम जोडपी विवाहबद्ध झाली. त्यांना संसारोपयोगी साहित्यही देण्यात आले. आतापर्यंत या माध्यमातून ७०० जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.
जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सोमवारी या सोहळ्यात उपस्थित राहून बारादरीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अगदी नियोजनबद्धरीत्या व कोणत्याही पक्ष, संघटनेशिवाय बारादरीतील युवकांनी ३० वर्षांपूर्वी सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद व उपयोगी ठरला आहे. विशेषत: गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा सोहळा आयोजित करण्यात येतो. ईद-ए-मिलादला विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अन्नदानही करण्यात येते. यातूनच १९८६ मध्ये तकीयार खान यांनी काही युवकांसह या उपक्रमास सुरुवात केली होती.
समाजातील गरजूंसाठीच हा उपक्रम सुरू केल्याने पहिल्याच वर्षी १२ जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. त्यानंतर या सोहळ्याला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने दरवर्षी जोडप्यांची संख्या वाढत गेली. गेल्या काही वर्षांपासून यासाठी खास नियोजन समिती गठित करण्यात येऊन त्या माध्यमातून नियोजनबद्ध सोहळा दरवर्षी ईदला होऊ लागला आहे. बारादरीतीलच युवक स्वत: सोहळ्यातील सर्व कामे करतात. समाजातील युवकांच्या मदतीतूनच हा सोहळा यशस्वी करीत आहेत, अशी माहिती सचिव सय्यद अहेमद हाश्मी यांनी दिली. सोहळ्यास वऱ्हाडींची संख्याही मोठी असल्याने भोजनाचीदेखील व्यवस्था केली जाते. विशेषत: शहरातीलच विवाह सोहळ्याशी संबंधित व्यावसायिक या उपक्रमासाठी नि:शुल्क सेवा देतात. यावर्षीही नोंदणीतून ३२ जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. यासाठी समितीचे अध्यक्ष अलहाज अब्दुल हाफिज, उपाध्यक्ष मोहंमद ताहेरअली खान, सचिव सय्यद अहेमद हाश्मी, सहसचिव शेरू, हाजी सिराजोद्दीन, समन्वयक हाजी अन्वरखान आदींनी पुढाकार घेतला.
बातम्या आणखी आहेत...