आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३४ पानी लग्नपत्रिकेद्वारे ज्वलंत विषयावर जनजागृती; मराठा अांदाेलन, स्त्रीस्वातंत्र्य, स्वच्छतेविषयी प्रबाेधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद : महागात महाग पत्रिका छापण्याचा ट्रेंड अलीकडच्या काळात रुजला आहे. आकर्षक कागद, विविध प्रकारच्या फोल्डिंग, अशा नानाप्रकारच्या पत्रिका सध्या बाजारात दिसतात. परंतु मुरूममध्ये (ता.उमरगा) २० डिसेंबरच्या लग्नासाठी छापलेली पत्रिका चर्चेचा विषय ठरली.
यात ३४ पानांवर महापुरुषांचे विचार, सध्याच्या ज्वलंत विषयावरील मराठा आंदोलन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या समज-गैरसमजावरही दोन्ही समाजांत प्रबोधन करण्यात अाले.
मुरूममधील विशाल व्हनाळे आणि राधिका जाधव तसेच आनंद चौधरी आणि मयूरी जाधव यांचा विवाहसोहळा २० डिसेंबरला मुरूमच्या श्रीराम मंगल कार्यालयात होणार आहे. नात्याने मामा-भाचे असलेल्या विशाल आणि आनंद यांचा एकत्रित विवाह करण्यामागे मोठी कल्पना आहे.
दोघांवरही पुरोगामी विचारांचा प्रभाव असून, त्यामुळे कर्मकांड नाकारून नव्या पद्धतीने दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. विशाल आणि आनंद यांनी लग्नपत्रिकेचे केलेले नियोजन वाखाणण्याजोगे आहे.
मराठा मोर्चाचे वादळ, त्यानंतर निघणारे प्रतिमोर्चे, मुली नाकारण्याची मानसिकता, व्यसनाधीनता, वृक्षप्रेम, शेतकऱ्यांच्या समस्या या विषयांवर पत्रिका तयार करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच पहिले १२ व्या शतकात पहिला आंतरजातीय विवाह लावणारे महात्मा बसवेश्वर आदी महापुरुषांचे कार्य, त्यांचे चरित्र या पत्रिकेतून मांडण्यात आल्याचे विवाहाचे संयोजक मोहन जाधव यांनी सांगितले.

ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी आम्ही वेगळ्या पद्धतीने विवाह लावण्याची सुरुवात केली. सारिका महेश भोसले, उज्ज्वला योगेश मोरे, पूनम रवींद्र भुजबळ आणि अजय व अजिंक्य मुळे यांचा विवाह अशा पद्धतीच्या पत्रिका वाटून करण्यात आला. ज्या कार्यकर्त्याच्या कुटुंबात विवाह आहे, त्यांच्याकडून पैसे न घेता आम्ही मित्रपरिवाराने एकमेकांचे पैसे जमवून वेगळ्या पत्रिका छापल्या. ही कल्पना सगळ्यांना आवडली.

नवरदेव विशाल व्हनाळे म्हणाले, महापुरुषांच्या कार्याची आठवण ठेवून प्रत्येकाने जीवन जगावे, हे सांगण्यासाठी आम्ही एवढ्या मोठ्या आकाराची पत्रिका तयार केली. समाजाला चांगल्या विचारांची शिकवण महापुरुषच देऊ शकतात.
पुस्तकरूपी पत्रिकेच्या
पहिल्या पानावर होणाऱ्या पती-पत्नींचे छायाचित्र तसेच विवाहाचा दिनांक, त्या दिवसाचे महत्त्व आणि सौजन्य असलेल्या संघटनांची नावे आहेत. २० डिसेंबर लग्नाची तारीख असून त्या दिवशी संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. दर्शनी भागात राजमाता जिजाऊंचे छायाचित्र आहे.

पान क्रमांक तीन ते पाच दरम्यान विवाहाबद्दल माहिती असून पान सहावर ‘मराठा आंदोलन : असंतोष आणि बहुजनवादी चळवळीची दिशा’, ‘मराठा आंदोलन, आरक्षण आणि समाजाची समस्या’, ‘स्त्री स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते : महात्मा बसवण्णा’ अशा विषयांवर लेख आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिमांशी नाते सांगणारा लेख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही लेख आहे. मुलींचे महत्त्व सांगणारी कविताही देण्यात आली आहे. विविध पृष्ठांवर संत रोहिदास, गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शहीद भगतसिंग, प्रबोधनकार ठाकरे आदींची छायाचित्रे आहेत. एका पत्रिकेसाठी केवळ ११ रुपये एवढा खर्च आला असून औरंगाबादमध्ये याची छपाई झाली.
बातम्या आणखी आहेत...