लातूर - मिरज येथून लातूरसाठी पाणी घेऊन येणाऱ्या रेल्वेच्या सातव्या फेरीचे सोमवारी पहाटे येथे आगमन झाले. आठवडाभरात या वॉटर एक्स्प्रेसने सात फेऱ्या केल्या असून ३५ लाख लिटर्स पाणी नागरिकांपर्यंत पोहोचले आहे.
लातूरकरांसाठी पाण्याची वाहतूक करणाऱ्या या रेल्वेला जलद रेल्वेचा दर्जा देण्यात आल्याने मिरजेचे पाणी लातुरात गतीने पोहोचत आहे. परिणामी १२ ते १८ एप्रिलपर्यंत दिवसाला एक या प्रमाणात सात फेऱ्या झाल्या आहेत. सुरुवातीची पहिली फेरी लातुरात दाखल होण्यासाठी तब्बल १८ तास लागले होते. त्यानंतर रेल्वेला येणारे अडथळे दूर करून सदर गाडीला जलदचा दर्जा देण्यात आल्याने अवघ्या सहा तासांत पाणी लातुरात येत आहे.
एका फेरीत ५ लाख लिटर पाणी
रोज १० वॅगनमधून एका फेरीत ५ लाख लिटर पाणी आणले जात आहे. रेल्वेने आणलेले पाणी प्रथम विहिरीत साठवले जाते व तेथून ते टँकरने आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. त्याचे टँकरद्वारे वितरण केले जात आहे. लातूर रेल्वेस्टेशन ते आर्वी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या पाइपलाइनचे काम पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वेस्टेशन ते आर्वी केंद्रापर्यंतचा टँकर्सचा प्रवास थांबेल. लवकरच मिरजेहून ५० वॅगनमधून २५ लाख लिटर्स पाणी आणण्यात येईल.