आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमी भावाची तूर भरण्यासाठी हवीत तब्बल तीन लाख पोती, पोती नसल्‍याने खरेदी बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - केंद्र शासनाच्या भाव स्थिरता योजनेअंतर्गत आधारभूत दराने लातूर जिल्ह्यात १५ डिसेंबरपासून तुरीची खरेदी करण्यात येत असून प्रचंड आवक झाल्याने शेतकऱ्यांनी विक्री केलेला माल भरण्यासाठी पोतीच शिल्लक नाहीत. त्यामुळे केंद्रावरील काटे बंद पडल्याने मार्केटिंग फेडरेशनने संबंधित विभागाकडे तीन लाख पोत्यांची मागणी केली आहे.  
 
जिल्ह्यात पणन महासंघाने आठ, तर नाफेडच्या वतीने एक खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.  तुरीला बाजारात ४५०० रुपये, तर हमीनुसार प्रतिक्विंटल ५०५० रुपयांचा सरकारकडून देण्यात येत आहे. 

त्यामुळे आधारभूत केंद्रावर गर्दी होत आहे. केंद्र शासनाने तूर खरेदीसाठी ९० दिवसांचा कालावधी निश्चित केला होता. त्यानुसार १५ मार्चपर्यंत ही खरेदी केंद्रे सुरू राहणार होती, परंतु मालाचा वाढता ओघ पाहता खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. यंदा चांगला पाऊस होऊन अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन झाल्याने तूर खरेदीत वाढ होत आहे. त्यामुळे खरेदीसाठी आवश्यक असणारा बारदाना आणि साठवणुकीसाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे वखार महामंडळाने पणन महासंघ, कॉटन फेडरेशन, जिल्हा पुरवठा अधिकारी, अादिवासी विकास महामंडळ, बाजार समिती, सहकारी संस्थांची गोदामे तूर साठवणुकीसाठी भाड्याने  घेण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.  
 
वेअर हाऊसचीही समस्या : खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठीही जागेचा प्रश्न भेडसावत आहेत. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे जिल्ह्यातील आठ गोडाऊन पूर्ण क्षमतेने भरले आहेत. लातूर व उदगीर येथील गोडाऊनमध्ये आणखी ३५ हजार क्विंटल माल साठवण्याची जागा शिल्लक आहे. त्यानंतर शेजारील नांदेड व परभणी जिल्ह्यातील गोदामात माल साठवण्यात येणार असल्याची माहिती वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक घन यांनी दिली. 

आणखी दीड लाख क्विंटल आवक  
लातूर जिल्ह्यात बारदाना नसल्याने तुरीची खरेदी बंद झाली आहे. आणखी दीड लाख क्विंटल तुरीची हमी भाव केंद्रावर आवक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५० किलो साठवणूक क्षमता असलेल्या तीन लाख पोत्यांची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे. पोती आल्यानंतर खरेदी सुरळीत होणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी यादव सुमठाणे यांनी दिली.  

उस्मानाबाद : ‘अवकाळी’चे सावट
येत्या ६ ते ८ मार्चदरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या अवकाळीमुळे राज्यभरातील हजारो हेक्टरवरील रब्बीची पिके धोक्यात येऊ शकतात. सर्वात गंभीर बाब म्हणजे सध्या राज्यभरात आधारभूत धान्य खरेदी केंद्रांच्या बाहेर शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान्य मापाच्या प्रतीक्षेत थप्प्या लावून ठेवण्यात आलेले आहे. या सर्व धान्यावर अवकाळीचे सावट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात नाफेडच्या ९ व इतर २४ आधारभूत धान्य खरेदी केंद्रांवर हमीभावाने तूर खरेदी करण्यात येत होती. यामध्ये केंद्राच्या योजनेंतर्गत सुरू असलेले २४ केंद्रे बंद पडल्यानंतर नाफेडच्याच केवळ ९ केंद्रांवर धान्य खरेदी सुरू होती. तुरीची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

परभणी : खरेदीसाठी पाचऐवजी नऊ काटे
शासकीय तूर खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या होत असलेल्या गैरसोयींकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधल्यानंतर आता प्रत्येक केंद्रावर तूर खरेदीसाठी पाचऐवजी नऊ काटे वाढविण्यात येणार आहेत. तसेच गर्दी लक्षात घेऊन टोकन सिस्टिम राबविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी (दि.दोन) येथे दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ. बाबाजानी दुर्राणी, आ. विजय भांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर यांनी पालकमंत्री पाटील यांची सावली विश्रामगृहावर भेट घेऊन गार्हाने मांडले. त्या वेळी पाटील यांनी हे आश्वासन दिले.
बातम्या आणखी आहेत...