आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Death, 7 Injured In Tempo Accident At Ghansavangi

घनसावंगी तालुक्यात कंदुरीसाठी जाणारा टेम्पो उलटून 4 ठार, 7 गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - कंदुरीच्या कार्यक्रमासाठी जाणारा टेम्पो उलटून चौघांचा मृत्यू, तर 20 जण जखमी झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथे बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे. टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुलाचा नवस फेडण्यासाठी रवना पराडा (ता. अंबड) येथील दर्गाशरीफ येथे हे भाविक निघाले होते. दरम्यान, काळाने त्यांच्यावर झडप घातली.
राजू रामभाऊ पवार (39, चिखली, ता.रिसोड), कांताबाई विनोद धोत्रे (23), पिराजी जयराम धोत्रे (60) व श्रावण वामन प्रधान (39, तिघेही रा. शंभू सावरगाव, ता. जालना) अशी मृतांची नावे आहेत. शंभू सावरगाव येथील विनोद धोत्रे यांच्या मुलाचा नवस फेडण्यासाठी अंबड तालुक्यातील रवना पराडा येथे कंदुरीचा कार्यक्रम होता. त्यासाठी धोत्रे कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थ टेम्पोने (एमएच 21 वाय 2663) जात होते. हनुमाननगरजवळ ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो उलटला. अपघात एवढा भीषण होता की टेम्पो तीन वेळेस उलटला. यात चौघांचा मृत्यू झाला. 15 जखमींना जालना तर 5 जणांना औरंगाबादला हलवण्यात आले आहे.


नवस बोलणा-या मातेचा मृत्यू; वंशाचा दिवा सुखरूप
विनोद धोत्रे यांना दोन मुलींनंतर तिसरा मुलगा झाला. मुलासाठी त्यांनी नवस केला होता. नवस फेडण्यासाठी ते चालले होते. नवस बोलणा-या कांताबाईचा या घटनेत मृत्यू झाला. त्यांच्याच मांडीवर असलेला त्यांचा मुलगा सिद्धिविनायक (8 महिने) सुखरूप बचावला. कंदुरीसाठी ज्या बोकडाचा बळी दिला जाणार होता तोही या भीषण अपघातातून बचावला.