आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Years Jail To Dr. Sudam Munde And Saraswati Munde

गर्भलिंगनिदानाचे प्रकरण: डॉ. सुदाम व सरस्वती मुंडे दांपत्यास ४ वर्षांची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान केल्याप्रकरणी येथील डॉ. सुदाम मुंडे व डॉ. सरस्वती मुंडे या दांपत्याला विविध प्रकारच्या आठ कलमांखाली सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवले. त्यांना ४ वर्षे कैद व ८० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या सर्व शिक्षा स्वतंत्रपणे असून डॉ. सरस्वती मुंडे यांचा जामीन फेटाळण्यात आल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

परळी येथील डॉ. सुदाम मुंडे यांच्या मुंडे हॉस्पिटलमध्ये गर्भवतींचे बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘लेक लाडकी अभियान’च्या प्रमुख अॅड. वर्षा देशपांडे, अॅड. शैलजा जाधव यांनी स्टिंग ऑपरेशन केले. सातारा येथून प्रेरणा भिल्लारे नावाच्या गर्भवतीला बनावट रुग्ण म्हणून १९ सप्टेंबर २०१० रोजी मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये पाठवले. डॉ. मुंडेने पाचशे रुपयांत तिची सोनोग्राफी केली. तिच्या हाती एक चिठ्ठी लिहून देत "१ बी' म्हणजेच गर्भात मुलगा असल्याचा उल्लेख केला. स्टिंग जगजाहीर केल्यानंतर मोठी आल्याने खळबळ उडाली होती.

स्टिंगच्या दोन दिवसांनंतर परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कैलास दुधाळ यांनी पीसीपीएनडीटी कायद्यानुसार केलेल्या तपासणीत रुग्णालयात अनेक त्रुटी आढळल्या होत्या. रुग्णालयाचे व्हिडिओ शूटिंगही करण्यात आले. रजिस्टर जप्त करून सोनोग्राफी मशीन सील करण्यात आली. नायब तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सातारा येथे जाऊन प्रकरणातील तिघींचे जबाब घेतले. यात डॉ.मुंडे यांनी गर्भलिंग निदान केलेल्या प्रेरणा भिल्लारेला मुलगाच झाला होता. यानंतर डॉ. दुधाळ यांनी प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान तंत्र कायद्यानुसार परळी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यात दोघांवर आठ गुन्हे दाखल झालेले होते. न्यायालयात हे प्रकरण ४ वर्ष ९ महिने चालले.

पाच जणांची साक्ष महत्वाची ठरली
प्रकरणात सातारा येथील ॲड.शैला जाधव, गरोदर माता प्रेरणा भिल्लारे, परळीचे तत्कालीन नायब तहसिलदार प्रसाद कुलकर्णी व विभागीय कार्यालयातील राजेंद्र जोशी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

सायंकाळी सुनावली शिक्षा
पीसीपीएनडीटी ॲक्टमधील विविध आठ कलमांनुसार मुंडे दांपत्यास सोमवारी परळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एल.जी.पाच्छे यांनी दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. सोमवारी सायंकाळी पाच वाजता न्यायालयाने निकाल दिला. या शिक्षा प्रत्येक कलमानुसार दोघांना वेगवेगळ्या भोगायच्या आहेत. प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून बालाजी आयनिले यांनी काम पाहिले.

डॉ. सुदाम मुंडेंना नाशिकहून आणले
सोमवारी सुनावणीसाठी डॉ.सुदाम मुंडे यांना नाशिकच्या कारागृहातून परळीला आणण्यात आले. तर त्यांच्या पत्नी सरस्वती मुंडे या परळीत जामिनावर होत्या. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरस्वती मुंडे यांचा जामीन अर्ज नामंजूर करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, अशी माहिती विशेष सरकारी वकील बालाजी आयनिले यांनी दिली.

या कलमांनुसार शिक्षा
पीसीपीएनडीटी ॲक्ट मधील कलम ३(३)२३, ५/२३, ६/२३, २९(१) (२) २३, ३(१) २३, ९, १७(१) (२) २३, १०(१), १०(१)(A)२३ या आठ कलमा नुसार ४८ महिने कैद व ८० हजार रुपये दंड अशी दोघांना शिक्षा ठोठावण्यात आली.