आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरासरीच्या ४० टक्के कमी पाऊस; चाऱ्याचा प्रश्न गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेर - उस्मानाबाद तालुक्यातील तेर महसूल मंडळात सरासरीच्या ४० टक्के पेक्षाही कमी पाऊस झाला आहे. यामुळे परिसरातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कडब्याचा भाव प्रति शेकडा ३५०० रुपयांपर्यंत जाऊन पोहाेचला असून जनावरे नदीच्या कोरड्या पात्रात व रस्त्याच्या बाजूने चाऱ्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात पशुखाद्य म्हणून ज्वारीचा कडबा व सोयाबीनचे भुस्कट पुरविणाऱ्या तेर परिसराला सतत ४ वर्षांपासून दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. तेर परिसरात अनेक शेतकऱ्यांना पशुपालनाचा मोठा आधार आहे. परंतु, गेल्या चार वर्षापासून पावसाअभावी चारा तसेच शेतातही काहीच पिकले नसल्याने या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
खरिपाच्या पेरणीला गतवर्षी पावसाने दगा दिला. गतवर्षी रब्बी हंगामही कमी पावसावरच काढावा लागला. १५०० ते १७०० रुपये प्रति शेकडा भाव असणारा कडबा यामुळे आता ३५०० रुपयांवर जाऊन पोहाेचला आहे. त्यामुळे भाकड जनावरांसह कामाची जनावरेही कशी जगवावीत हा प्रश्न बळीराजासमोर उभा राहिला आहे. याही वर्षी पावसाने तेर परिसराकडे पाठच फिरविल्याचे दिसून येत आहे. या मंडळात आतापर्यंत केवळ २७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.सोयाबीनचे पीक जोमात आले परंतु, ऐन फुलोऱ्यात पावसाने दडी मारल्याने शेंगाच आल्या नाहीत. त्यामुळे एकीकडे पिकांची तर दुसरीकडे जनावरांची होणारी उपासमार पाहून शेतकरीही चिंताग्रस्त बनला आहे.या भागात वाणेवाडी व तेर येथे चारा छावण्या उभारल्या होत्या. परंतु, ३० जूनपासून त्याही बंद झाल्याने अाता चाऱ्याचा प्र‌श्न बिकट बनला अाहे.

परिसरात जनावरांची संख्या मोठी
तेर व परिसरात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तेर-५७६९, हिंगळजवाडी-१४४५, पानवाडी-६२५, रामवाडी-४८७, बुकनवाडी-९९६, घोगरेवाडी-६८७, थोडसरवाडी-८६६, भिकार सारोळा-१४७२, म्होतरवाडी-८३९, मुळेवाडी ९५२ अशी जनावरांची संख्या आहे. तसेच एकट्या तेरमध्ये शेळ्या-मेंढ्याची संख्या ४७०० इतकी आहे. या सर्वांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

भूक भागविण्यासाठी जनावरांची कोरड्या नदीपात्रात धडपड
चारा छावण्या बंद झाल्याने शेतकऱ्यांना आपली जनावरे पुन्हा शेताकडे आणावी लागली. ही जनावरे जगण्यासाठी तेरणा नदीच्या कोरड्या पात्रात तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या खुरट्या गवतासाठी धडपड करताना दिसत आहेत. पावसाळा अवघा २५ दिवस राहिला आहे. या दिवसांत परतीच्या पावसाने दमदार हजेरी न लावल्यास तेर व परिसराला जनावरांच्या चाऱ्याबरोबरच माणसांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. छावण्या बंद झाल्याने अाता पुढे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत अाहे.
बातम्या आणखी आहेत...