आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४२ लाख रुपये चोरणारे चाैघे एलसीबीच्या ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूरशहरातील एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे ४२ लाख रुपये पळवणाऱ्या चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
सुरेश रणछोड राजपूत हे लोखंड गल्लीत असलेल्या प्रकाश कांतीलाल अँड सन्स या कुरिअर कंपनीत नोकरीला आहेत. ही कंपनी अहमदाबादची असून त्याची लातुरात शाखा आहे. राजपूत हे ३० मेच्या रात्री साडेसात वाजता उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट दोन समोरून आपल्या एका सहकाऱ्यासह स्कूटीवरून घराकडे जात होते. त्यावेळी ते वलसे हॉस्पिटलजवळ आले असता त्यांच्याकडे दोघे जण पायी, तर दोघे दुचाकीवरून आले. त्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली सुरेश यांच्या हातातील ४२ लाख रुपये असलेली पैशांची बॅग हिसकावून पलायन केले होते. त्यानंतर गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून घटनेचा तपास करण्यात येत होता; परंतु तपासात प्रगती होत नसल्याने पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास सुपूर्द केला होता.
दरम्यान, सदरची रक्कम हवाला व्यवहारातील असल्याची चर्चा सुरुवातीला होती. परंतु फिर्यादीने ही रक्कम व्यापारातीलच असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. गांधी चौक पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी विविध पथके स्थापन करून सर्व बाजूने तपास करण्याचा प्रयत्न केला. व्यापारी, संस्था, आस्थापने यांच्याकडील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. परंतु गुन्हेगार सापडत नव्हते. शेवटी स्थानिक गुन्हे शाखेचे पेालिस निरीक्षक बी. जी. मिसाळ यांच्याकडे तपासाची सूत्रे येताच त्यांनी आराेपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले.

एकूण सहा आरोपी
स्थानिकगुन्हे शाखेच्या पथकाने रात्री मोठ्या शिताफीने सुरुवातीला दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याशी विचारपूस करून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर आणखी दोघांना अटक केली. या प्रकरणात एकूण सहा आरोपी असल्याचेही उघड झाले आहे. त्यापैकी दोघे जण लातूर तालुक्यातील कातपूर येथील, तर उर्वरित चौघे शहरातील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हे सर्व आरोपी २५ ते ३० वयोगटातील अाहेत.