आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

42 हजार शेतक-यांची वीज जोडणी तोडली! पैसे भरल्याशिवाय जोडणी देणार नसल्याचा पवित्रा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - वीज कंपनीच्या लातूर झोनअंतर्गत येणाया उस्मानाबाद, बीड आणि लातूर या तीन जिल्ह्यांत दोन महिन्यांत 42 हजार 511 कृषिपंपांची वीज तोडण्यात आली आहे. त्यांच्याकडे 38 कोटी 57 लाख रुपयांची थकबाकी असून ती मिळाल्याशिवाय वीज जोडणार नसल्याचा पवित्रा वीज कंपनीच्या अधिकायांनी घेतला आहे.
ऐन रब्बी हंगामात वीज नसल्यामुळे पाणी असूनही ते शेतीला देता येत नसल्याने ग्रामीण भागात असंतोष निर्माण झाला आहे. वीज कंपनीच्या लातूर झोनमध्ये येणाया तीन जिल्ह्यांमध्ये आक्टोबर महिन्यापासून कृषिपंपाची वीज तोडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील पावसामुळे पाण्याची गरज भासली नाही. मात्र, आता रब्बीचा हंगाम सुरू आहे. हरभरा, गहू, ज्वारी, तूर, ऊस ही पिके बहरात आहेत. या पिकांना एक ते दोन पाण्याची गरज असते. अशा वेळी शेतात पाणी आहे पण वीज नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामीण भागात असंतोषाचे वातावरण आहे. भारनियमनाचाही फटका शेतीला बसतो आहे. 12 तास वीज आणि 12 तास भारनियमन असे वेळापत्रक असल्यामुळे अडचणी येत आहेत.
राजकारणीही आक्रमक
वीज तोडल्यामुळे नाराज झालेले शेतकरी सत्ताधारी राजकारण्यांना जाब विचारीत आहेत. निवडणुका तोंडावर असताना शेतक-यांची नाराजी सत्ताधायांना परवडणारी नाही. त्यामुळे कृषिपंपाची वीज तोडण्याच्या निर्णयाचा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनीही विरोध केला आहे. शेतकयांची वीज तोडणे योग्य नाही याबद्दल राज्य सरकारला सूचित केले जाईल, असे विधान शरद पवारांनी नुकतेच केले आहे. मात्र, तरीही कार्यवाही झालेली नाही. उस्मानाबादचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनाही भूममध्ये शेतकयांच्या नाराजीचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी वीज कंपनीच्या अधिकायांकडे विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य बदलात नाव असणारे लातूरचे आमदार अमित देशमुख दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमासाठी लातूर तालुक्यातील जोडजवळा येथे गेले असता तेथे शेतक-यांनी त्यांच्याकडे वीज तोडीच्या तक्रारी केल्या. परिस्थिती ऐकून घेतल्यानंतर अमित देशमुखांनी थेट आपल्याच सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

महावितरणचे अभियंते तणावाखाली

वीज कंपनीने ही मोहीम राबवताना तीन महिन्यांत आपल्या अभियंत्यावरही दबाव ठेवला आहे. कामचुकारांना नोटिसा बजावणे, कारणे दाखवा नोटिसा देणे, बदल्या करणे अशा कारवाया सुरू आहेत. लातूरमध्ये 11 तर बीड, उस्मानाबादमध्ये 22 जणांना नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे अभियंत्यांमध्ये स्वत:च्याच वरिष्ठांबद्दल नाराजी आहे. लातूरमध्ये सबआर्डिनेट इंजिनिअर असोसिएशनने तर लातूरच्या मुख्य अभियंत्यांवरच कारवाई करण्याची मागणी केली आहे, तर मुख्य अभियंत्यांनी ही कारवाई थेट आपण केली नसून ती अधीक्षक अभियंत्यांच्या पातळीवर झाल्याचे सांगून अंग झटकले आहे.

पैसे भरल्याशिवाय जोडणी नाही
शेतकयांच्या थकबाकीपोटी वीज तोडण्याचा निर्णय सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळानेच घेतला आहे. त्यानुसारच ही मोहीम सुरू केली आहे. आम्हाला तसे आदेश आहेत. थकबाकीदारांनी पैसे भरल्याशिवाय लातूर झोनमधील शेतकयांची वीजजोडणी कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही.
बी. बी. पाटील, मुख्य अभियंता, लातूर झोन

कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित
जिल्हे वीजपुरवठा खंडित थकबाकी वसुली
लातूर 17 हजार 152 14 कोटी 83 लाख 1 कोटी 80 लाख 36 हजार
बीड 11 हजार 878 14 कोटी 32 लाख 2 कोटी 4 लाख 27 हजार
उस्मानाबाद 13 हजार 481 9 कोटी 41 लाख 2 कोटी 78 हजार