आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 45 Bore In 500 Feet Under The Ground To Solve Water Problem

भूजल ५०० फुटांवर तरीही ४५ बोअर घेणार, महापालिकेचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - शहरातील पाणीपातळी पाचशे फुटांच्या खाली गेली असली तरी शहरातील पाणीटंचाईवर तोडगा म्हणून महापालिका शहरात आणखी ४५ बोअर घेणार आहे. सरकारी नियमांनुसार २०० फुटांच्या खाली बोअर घेता येणार नाही. त्यामुळे साहजिकच नव्या बोअरला पाणीही लागणार नाही. तरीही महापालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी बोअर घेण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी एक कोटी रुपये खर्ची पडणार आहेत.

‘रोग म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला’ अशी एक म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. लातूर महापालिकेच्या कारभाराकडे पाहिले की ही म्हण का प्रसिद्ध झाली असावी याचे उत्तर मिळते. लातूर शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. गेली तीन वर्षे आठ दिवसाला होणारा पाणीपुरवठाही गेल्या पंधरा दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे धरण भरलेच नाही.
गेल्या तीन वर्षांपासून मृतसाठ्यावर पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातच शहरातील पाणीपुरवठा करणारी अंतर्गत जलवाहिनी ४० वर्षे जुनी आहे. त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्यामुळे ५० टक्क्यांहून अधिक पाण्याची गळती होते. जागोजागी व्हॉल्व्ह नसल्यामुळे शेवटच्या टोकाला पाणी द्यायचे असेल तर पहिल्या कॉलनीतील पाणी दिवस-दिवस सुरूच ठेवावे लागते. या व्यवस्थेला पर्याय म्हणून नगर परिषद असतानाच्या काळात शहरात सुमारे ४०० बोअर घेऊन तेथे साठवणुकीसाठीच्या छोट्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्या स्टँडपोस्टद्वारेही पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही ठिकाणांहून पाणी येणार नाही हे गृहीत धरून बहुतांश नागरिकांनी आपापल्या घरात बोअर घेतले आहेत. किमान ९० टक्के घरांमध्ये बोअर असल्याचे महापालिकेचेच अधिकारी खासगीत सांगतात. गेल्या वर्षी चांगला पाऊस पडला नसल्यामुळे चारशे फूट खोल असलेल्या बोअरचेही पाणी आटले आहे. त्यामुळे बोअर असूनही टँकरने पाणी घ्यावे लागण्याची वेळ लातूरकरांवर आली आहे. पाण्याच्या या सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी नक्की काय उपाययोजना करावी याचा आराखडा महापालिकेकडे अद्यापही तयार नाही. मात्र, यावर उपाय म्हणून महापालिका शहरात आणखी ४५ बोअर घेणार आहे.
महापालिकेने दोन दिवसांपूर्वी जाहीर निविदा काढून बोअर घेणे, लहान पाण्याची टाकी उभारणे, बोअर ते टाकी अशी पाइपलाइन करणे अशा ४५ कामांच्या निविदा काढल्या आहेत. या योजनांची एकूण सरासरी किंमत एक कोटी रुपयांच्या घरात जाते.
महापालिकेत विरोधकही चिडीचूप
महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष विरोधकांच्या भूमिकेत आहेत. मात्र, एक कोटी रुपये खर्च करून आणखी बोअर पाडण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेला त्यांनी विरोध केलेला नाही. एरवी इतर लहान-मोठ्या बाबींवरून गदारोळ करणारे विरोधी पक्ष पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर मात्र चिडीचूप बसून आहेत.
टंचाई निवारणासाठी काय करावे ?
खरे तर महापालिकेने मोठ्या प्रमाणात पुनर्भरणाची मोहीम आखायला हवी. त्यामुळे शहरातील सध्याच्या बोअरला उन्हाळ्यापर्यंत पाणी राहू शकते. उन्हाळ्यात महापालिकेने ग्रीन बेल्टमध्ये काही ठिकाणी खड्डे खोदले आणि पुनर्भरण केल्याचे सांगितले. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्या खड्ड्यात कचरा ओतला जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिका शहरातील पाण्याविषयी किती गंभीर आहे हे दिसून येते.
भंडारवाडीची योजना झालीच नाही
दोन वर्षांपूर्वी तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी येथून लातूरसाठी स्वतंत्र पाइपलाइन करून पाणी आणण्याच्या योजनेसाठी ३० कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, नऊ वेळा निविदा काढूनही एकाही कंत्राटदाराने ती भरली नाही. त्यामुळे तातडीची योजना असे स्वरूप असलेल्या या कामाचे कंत्राटच निघाले नाही. परिणामी पैसा पडून राहिला आणि टंचाई कायम राहिली.