आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4G WI FI Facility For The Osmanabad City In Fave Days

डिसेंबरअखेर संपूर्ण उस्मानाबाद शहर होणार फोरजी वायफाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- उस्मानाबाद शहरात लवकरच रिलायन्स कंपनीच्या सहकार्याने फोरजी वायफाय सेवा सुरू केली जाणार असून रिलायन्सच्या युजर्सना दररोज सुरुवातीची २० मिनिटे फ्री सेवा देण्यात येणार आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी रविवारी सायंकाळी "प्रकाशाचे आनंदगाणे' या कार्यक्रमात ही माहिती दिली. संपूर्णत: फोरजी वायफाय होणारे उस्मानाबाद हे महाराष्ट्रातील पहिले शहर असेल.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात रिलायन्सने गेल्या महिन्यात ५ हॉटस्पॉट बसवून फोरजी वायफाय सेवा सुरू केली आहे. मात्र, त्यामुळे संपूर्ण शहर कव्हर झालेले नाही. गेल्या महिन्यात रिलायन्सची टीम उस्मानाबादेत येऊन गेली. त्यांनी डिसेंबरअखेर फोरजी वायफाय सेवा सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी काम सुरू झाले असून वायरिंगचे काम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेले आहे. शहरात एकूण २० हॉटस्पॉट कार्यान्वित करण्यात येणार आहेत. उस्मानाबाद पालिका येत्या दहा दिवसांत यासंदर्भातील ठराव देणार असून त्या बदल्यात पालिकेला अल्प दरात सर्व्हिस देण्याची तयारी रिलायन्सने दर्शवली आहे. पत्रकार संघाच्या वतीने "प्रकाशाचे आनंदगाणे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार राणा पाटील यांनी ही माहिती दिली. त्यांनी समाजोपयोगी कार्यक्रमासाठी पत्रकार संघाला एक लाख रुपयांची मदतही या वेळी जाहीर केली.

दीपावलीनिमित्त रविवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
गायक श्रीराम पोतदार, प्रा. राहुलदेव कदम, आसावरी जोशी यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, सुरेश वाडकर, जितेंद्र अभिषेकी यांच्या बाजाच्या पोतदार यांनी केलेल्या मिमिक्रीमुळे सभागृहात हास्याचे लोट उसळले होते. प्रा. राहुलदेव कदम यांनी सादर केलेल्या संतोष नारायणकर, सतीश दराडे, वैभव देशमुख आणि शेखर
गिरी यांच्या गझलांना रसिकांनी दाद दिली. आसावरी जोशी यांच्या "शुक्राची चांदणी' या लावणीने कार्यक्रमात अधिक उत्साह भरला. शेखर गिरी आणि सतीश दराडे या तरुण गझलकारांनी आपल्या दमदार रचना सादर केल्या. व्हायोलिन शिवाजी पोतदार, सिंथेसायझर सिद्धार्थ सूर्यवंशी तर तबल्याची साथसंगत संतोष लोमटे यांनी केली. निवेदन कवी
रवींद्र केसकर यांनी केले.
२ मिनिटांत पिक्चर डाऊनलोड होणार
रिलायन्सची फोरजी वायफाय सेवा कार्यान्वित झाल्यास ९० ते १०० केबीपीएस स्पीड मिळेल. त्यामुळे अवघ्या दोन मिनिटांत ३ तासांचा चित्रपट डाऊनलोड होईल.

अशी आहे तयारी
रिलायन्स कंपनीने यापूर्वीच शहरातील अंतर्गत वायरिंग पूर्ण केली आहे. डिसेंबरअखेर स्पॉटची कामे पूर्ण करून सेवा सुरू करण्यात येईल.

अॅप्स डेव्हलप करण्याची संधी देण्याची अपेक्षा
उस्मानाबादेत रिलायन्स फोरजी वायफाय सुरू करत असून ही बाब आपल्या शहरासाठी महत्त्वाची आहे. रिलायन्सने नवनवीन स्कीमचा फायदा देतानाच शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलांना, इच्छुक नागरिकांना अॅप्स डेव्हलप करण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा आपण रिलायन्सकडे व्यक्त केली असून यासंदर्भात कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.