आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मशानभूमीचा वाद; 5 तास अंत्यविधी रोखला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून सोमवारी तालुक्यातील कारवाडी येथे पाच तास अंत्यविधी रोखण्यात आला. तहसील कार्यालय आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर वाद थांबला आणि शेवटी आज दुपारी सव्वाचार वाजता अंत्यविधी पार पडला.

 
कारवाडी येथील स. वजीरबी स. महेमूद (६५) यांचे रविवारी आजारामुळे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कारवाडी भागातील दफनभूमीत करण्याचे निश्चित करण्यात आले. पाहुणे मंडळी आल्यावर अंत्ययात्रा दफनभूमीत नेण्यात आली, परंतु दफनभूमीची जागा आमच्या मालकीची आहे, असे म्हणून नीलाबाई भगवान बर्वे या महिलेने अंत्यविधीची प्रक्रिया रोखली. सकाळी १०.३० च्या सुमारास जमीन खोदण्यास गेलेल्यांना सदर महिलेने प्रतिबंध केल्याने मोठाच पेच निर्माण झाला आणि मृताचा मुलगा स. इब्राहिम स. महेबूब यांनी शेवटी ग्रामीण पोलिस ठाणे आणि तहसीलदारांकडे तक्रार केली.

त्यानंतर नायब तहसीलदार एम. एन. बोथीकर, ग्रामीणचे पीआय मधुकर कारेगावकर हे घटनास्थळी दाखल झाले. मंडल अधिकारी शेख अल्लाह बक्ष, तलाठी टी. एन. पारीसकर यांनी तहसील कार्यालयातील अभिलेखानुसार सदर जमीन मुस्लिम समाजाचे कब्रस्तान असल्याचा अहवाल तत्काळ नायब तहसीलदार बोथीकर यांना दिला. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी अंत्यविधीस प्रतिबंध करणाऱ्या महिलेस नोटीस बजावून घटनास्थळाहून जाण्यास सांगितले. त्यावरही अंत्यविधीस अडथळा निर्माण करणारी नीलाबाई बर्वे या महिलेने आपली बडबड चालूच ठेवल्याने पोलिसांनी तिला कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर तिने कब्रस्तान सोडले आणि अंत्यविधी सव्वाचार वाजता तहसील आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
 
बातम्या आणखी आहेत...