आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीकात्मक आंदोलनाचा शब्द दिला; 5 मिनिटे अडवली रेल्वे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लातूर-मुंबई रेल्वेचे बिदरपर्यंत झालेले विस्तारीकरण तातडीने मागे घेऊन लातूरच्या हक्काची गाडी पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी लातूरकरांनी येथील स्थानकावर रेल रोको आंदोलन केले.  पंढरपूर-निझामाबाद एक्स्प्रेस गाडी अडवण्यात आली. रेल्वे बचाव कृती समितीचे कार्यकर्ते, सामाजिक संघटना, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि प्रवासी आंदोलनात सहभागी झाले होते.  

आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात लोक येणार असल्याने आणि एखादी अप्रिय घटना घडू नये म्हणून सोमवारपासूनच बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महाराष्ट्र पोलिसांसह शेकडो पोलिस व अधिकारी तैनात करण्यात आले होते. आमदार अमित देशमुख, त्र्यंबक भिसे आणि विक्रम काळेही आंदोलनात सहभागी झाले होते. लातूर-मुंबई रेल्वे लातूर स्थानकावरून सुटणारी एकमेव गाडी आहे. तिला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असल्याने ती मोठ्या फायद्यात चालते. या गाडीत जागा मिळण्यासाठी हजारो जण प्रतीक्षेत असतात तर शेकडो लोक  तिकीट काढून उभे राहून प्रवास करतात. अशा स्थितीत या गाडीचा विस्तार करण्यात आल्याने लातूरसह उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातीलही प्रवाशांची गैरसोय झाली आहे. सोमवारी रेल रोको करून लातूर-मुंबई पूर्ववत सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा आमदार अमित देशमुख यांनी दिला आहे. तसेच या प्रश्नावर रेल्वे मंत्रालयाने १५ दिवसांचा अवधी मागितला आहे. त्यानंतरही निर्णय न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

५०० पोलिस अाणि ४०० आंदोलक
लातूर बंदनंतर पुकारलेल्या रेल रोको आंदोलनाला रेल्वे प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने घेतले. त्यामुळेच सोलापुरातील रेल्वेच्या विभागीय कार्यालयातील वरिष्ठांनी थेट विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांना पत्र लिहून रेल्वेस्थानकावर बंदोबस्त देण्याची विनंती केली होती. त्यानुसार रेल्वे पोलिस आणि लातूर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी चांगलीच मोर्चेबांधणी केली होती. पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या ५०० च्या वर अन् आंदोलक ४०० असे गणित होते. त्यामुळे प्रत्येक आंदोलकांच्या मागे एक पोलिस असे समीकरण झाले होते. आंदोलकांपेक्षा पोलिस जास्त असल्याचे निदर्शनास आले. रेल्वेस्थानकाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र सकाळपासूनच होते. 

प्रबंधकांना निवेदन  
आंदोलकांनी  रेल्वेस्थानक प्रबंधक अशोक उपाध्याय यांना निवदेन दिले आहे. त्यात  लातूर- मुंबई गाडी पूर्ववत सुरू करावी, हैदराबाद- पुणे आणि कुर्ला- बिदर नियमित सुरू करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

यांचा पुढाकार
आंदोलनात अॅड. उदय गवारे,  अॅड. व्यंकट बेद्रे, मोईज शेख, मुर्गाप्पा खुमसे, बसवंत भरडे, माधव गंभीरे, पप्पू कुलकर्णी, एस.आर. देशमुख, दगडू पडिले, सपना किसवे, स्मिता खानापुरे, दत्ता मस्के, अहमदखाँ पठाण, रईस टाके, अशोक गोविंदपूरकर, विक्रांत गोजमगुंडे, गोपाळ बुरबुरे, प्रदीप गंगणे, शंकर गुटे आदी सहभागी झाले.

आंदोलकांनी पंढरपूर-निझामाबाद एक्स्प्रेस गाडी अडवून निषेध नोंदवला. प्रतीकात्मक आंदोलन करण्याचा शब्द दिल्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आत सोडले आणि पाचच मिनिटे रेल्वे अडवून आंदोलन संपले. 
बातम्या आणखी आहेत...