आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकरमधील ५० तोळे सोने परस्पर काढून घेतले, तत्कालीन मॅनेजरवर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी - स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या कडा शाखेतील लाॅकरमध्ये महिलेने ठेवलेल्या ५० तोळे सोन्यासह दस्तऐवज लांबवल्याप्रकरणी बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह महिलेच्या पुतण्यावर आष्टी ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोपट विठ्ठल दारकुंडे व राजू सखाराम नलावडे अशी आरोपींची नावे असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कडा येथील एसबीएच शाखेच्या ग्राहक सुमन तुकाराम नलावडे यांनी १९९८ मध्ये कडा शाखेमधील लॉकर घेतले. ४२ क्रमांकाच्या लॉकरमध्ये त्यांनी ५० तोळे सोने आणि काही दस्तऐवज ठेवले होते.
२००७ पर्यंत हे लॉकर त्यांनी उघडले नाही. दरम्यानच्या काळात सुमन नलावडे यांनी लॉकर चावी हरवल्याची माहिती शाखा व्यवस्थापकांना दिली. २४ जून २०१४ रोजी घरबांधणीसाठी पैशांची आवश्यकता असल्याने सोने काढण्यासाठी त्या बँकेत गेल्या. मात्र, लॉकर तोडण्यात आल्याचे त्यांना दिसून आले. लॉकरमध्ये सोने नसल्याचे कळताच त्यांनी चौकशी केली. लेजर बुक तपासले असता सुमनबाईच्या मराठीतील स्वाक्षरीऐवजी राजू सखाराम नलावडे यांच्या इंग्रजी स्वाक्षरीशी मिळती जुळती स्वाक्षरी आढळून आली. हा व्यवहार २३ नोव्हेंबर २००७ रोजी केल्याचे दिसून आले . मात्र त्या वेळी कडा पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याने सुमनबाईंनी २१ एप्रिल २०१५ रोजी आष्टी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून तत्कालीन शाखा व्यवस्थापक व सुमनबाईंच्या पुतण्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. सहायक पाेलिस निरीक्षक संतोष शेगावकर, पोलिस नाईक सुभाष मोटे यांनी सुमनबाईचा पुतण्या राजू सखाराम नलावडे तत्कालीन शाखा व्यवस्थापक पोपट विठ्ठल दारकुंडे यांना ताब्यात घेतले आहे.
शाखा व्यवस्थापक दोषी
शाखा व्यवस्थापकाकडे एक चावी असल्याने त्या चावीचा वापर केला जातो. त्यामुळे शाखा व्यवस्थापकावर जबाबदारी असल्याने तेही दोषी आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
संतोष शेगावकर, सहायक पोलिस निरीक्षक
मी चौकशीला तयार
बँकेतील लॉकरमधील व्यवहार २३ नोव्हेंबर २००७ रोजी दाखवला आहे. प्रत्यक्षात व्यवहार कधीही झाला तरी पुढची तारीख नोंदवली जाऊ शकते. मात्र सुमनबाईचा फोटो असून त्यांची स्वाक्षरी मराठीऐवजी इंग्रजी असल्याने यामध्ये काही तरी षडयंत्र असावे, माझी चौकशीला जाण्याची तयारी आहे. असे बँकचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक पोपट दारकुंडे म्हणाले.
पंचांसमक्ष कार्यवाही
लॉकरची चावी हरवल्यास एका बाँडवर ग्राहकांच्या सह्या घेऊन सहीचे परीक्षण होते. त्यानंतर ज्या कंपनीचे लॉकर आहे त्या कंपनीशी पत्रव्यवहार करून दोन पंचांसमोर लॉकर उघडले जाते.
देविदास तुळजापूरकर, बँकिंगचे अभ्यासक