आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 50 Industrial Clusters In Two Years In Marathwada

मराठवाड्यात आगामी दोन वर्षांत ५० औद्योगिक क्लस्टरची करणार उभारणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी येत्या दोन वर्षांत विभागात विविध ठिकाणी ५० क्लस्टरची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट सीएमआयएने निश्चित केले. त्यासाठी मंगळवारी क्लस्टर विकास सेलची स्थापना करण्यात आली. दोन महिन्यांत या क्लस्टर विकासाचा रोडमॅप निश्चित केला जाणार आहे.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर क्लस्टर विकास सेलचे उद््घाटन उद्योग विभागाचे सहसंचालक प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी मुनीश शर्मा, आशिष गर्दे, मुकुंद कुलकर्णी, मिलिंद कंक यांची उपस्थिती होती. सीएमआयएच्या वतीने वेगवेगळ्या विषयांवर समित्या नेमल्या आहेत. या माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाते. आता क्लस्टर विकास सेलच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत क्लस्टरची निर्मिती कशी करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. देशभरात १२०० पेक्षा अधिक क्लस्टर आहेत. मात्र, त्या तुलनेत मराठवाडा पिछाडीवर असून केवळ चार क्लस्टर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात उद्योग वाढावे यासाठी सीएमआयएने पुढाकार घेतला आहे. क्लस्टरसाठी केंद्र सरकारकडून साधारण ५ ते १५ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात काही उद्योजकांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास सीएमआयए त्यांना सहकार्य देईल, असे मुनीश शर्मा यांनी सांिगतले. उपसंचालक व्ही. बी. सोन्ने यांनी क्लस्टरविषयी सादरीकरण केले. आशिष गर्दे यांनी आभार मानले.

अॅग्रो फूड प्रोसेसिंग उद्योगाला देणार प्राधान्य : मराठवाड्यात कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योगाला मोठी संधी आहे. अॅग्रो, केमिकल, फार्मा, कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रिकल, फूड प्रोसेसिंग, प्लास्टिक यासह अनेक उत्पादनांसाठी क्लस्टर करता येणे शक्य आहे. सध्या मराठवाड्यात १७ क्लस्टरसाठी काम सुरू आहे. त्यामुळे परभणी, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांतदेखील उद्योगाचे नवे दालन या माध्यमातून सुरू होऊ शकते.

क्लस्टर म्हणजे नेमके काय ?
आधुनिक औद्योगिकीकरणात क्लस्टर ही अलीकडच्या काळात रुजलेली संकल्पना. एकाच क्षेत्रातील एक रुपयांपासूनची छोटी वस्तू ते कोट्यवधी रुपयांची मशिनरी एकाच छताखाली मिळणे हेच क्लस्टरचे मुख्य वैशिष्ट्य. विशिष्ट भौगोलिक भागातील कच्च्या मालाची उपलब्धता, कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञानावर आधारित अनेक छोट्या -मोठ्या उद्योगांची उभारणी ठरावीक क्षेत्रात केली जाते. त्याला क्लस्टर म्हटले जाते. विशिष्ट उद्योगांसाठी क्लस्टरही असू शकतात. उदाहरणार्थ -औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीतील ऑटोक्लस्टर वाहनांच्या सुटे भाग निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. क्लस्टरमधून विक्रेता व खरेदीदार यांच्यातील देवाण-घेवाण सुलभ होते. खरेदीदाराला हवे ते एकाच ठिकाणी मिळते. विक्रेत्याला खरेदीदार शोधत फिरण्याची गरज सहसा भासत नाही.
असा होईल फायदा
- मराठवाड्यात ५० क्लस्टरची निर्मिती झाल्यास या माध्यमातून ५०० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
- क्लस्टरच्या निर्मितीसाठी १० ते १५ कोटी रुपये खर्च होतो.
- या क्लस्टरच्या माध्यमातून मराठवाड्यात जवळपास ५०० उद्योजक निर्माण होऊ शकतात.
- किमान ५००० लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
...तर क्लस्टरचे को-ऑपरेटिव्ह होईल
क्लस्टर निर्मिती करताना उद्योजकांनी केवळ एकट्याने नफा कमवायचा हा उद्देश ठेवून सहभागी होऊ नये, अन्यथा या क्लस्टरची अवस्था सहकारी कारखान्यासारखी होईल. एकत्रित येऊन नफा कमवणे आणि पुढे जाणे हाच उद्देश डोळ्यासमोर असायला हवा. मार्केटिंगचेही नियोजन व्हायला हवे.
मुकुंद कुलकर्णी, उद्योजक

क्लस्टरमुळे मराठवाड्यातील उद्योगवाढीला चालना मिळेल. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती ग्रामीण भागात नसल्यामुळे त्याचा फायदा त्यांना मिळत नाही. मात्र, या माध्यमातून ग्रामीण भागात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण तयार होईल.
प्रभाकर देशमुख, सहसंचालक (उद्योग)