आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठण शहर विकासासाठी 51 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - नगरपालिकेचा २०१७-१८ या वर्षासाठीचा ५१ कोटी ३७ लाख सात हजार रुपये खर्चाचा आणि दहा लाख २९ हजार दोनशे रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.  
पैठण नगरपालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्पीय विशेष सभेचे नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन केले होते. मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. या वेळी अर्थसंकल्पाचे वाचन मुख्य लेखापाल हरिदास वाघ यांनी केले.   
 
नगरपालिकेचे अपेक्षित उत्पन्न ५१ कोटी ४७ लाख ३६ हजार २०० रुपये इतके असून त्यामध्ये करापासून पालिकेला २ कोटी ५० हजार, सेवा व मालमत्ता यापासून ४४ लाख रुपये, आमदार निधी, खासदार निधी, जिल्हा नियोजन, महाराष्ट्र सुजल निर्मल अभियान, रस्ते विकास अनुदान, दलित वस्ती सुधार योजना, पैठण आपेगाव विकास प्राधिकरण आदी शासकीय अनुदानातून  नगरपालिकेला ३६ कोटी ५७ लाख रुपये मिळेल, असे अपेक्षित आहे. पालिका कर्मचारी व अधिकारी वेतन व भत्त्यांवर, अंशदान, मोबदला व निवृत्तिवेतन आणि अंतिम लाभ यावर ६ कोटी ३९ लाख ८२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच गटारे व नाली बांधकाम दुरुस्ती, प्रसाधनगृहे दुरुस्ती, रस्ते व पदपथ दुरुस्ती, नगर परिषद वाहन खरेदी, फर्निचर खरेदी यांसह अन्य बाबीसाठी जवळपास २ कोटी ६६ लाख रुपये खर्चाची तरतूद या संकल्पात करण्यात आली आहे. 

राष्ट्रीय सण, संत एकनाथ महाराज षष्ठी महोत्सव, महापुरुष पुतळे पुष्पहार व रंगरंगोटीवर २ कोटी ९६ लाख वीस हजारांची भरीव खर्च करण्याची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अशा प्रकारे ५१ कोटी ३७ लाख सात हजार रुपये खर्च होणार असल्याचे अपेक्षित असून १० लाख २९ हजार दोनशे रुपये शिल्लक राहणार आहेत.  अर्थसंकल्पाच्या विशेष सभेस उपाध्यक्षा सुचित्रा जोशी, दत्ता गोर्डे, माया आडसूळ, बजरंग लिंबोरे, सोमनाथ परळकर, आबा बरकसे, प्रकाश वानोळे, पुष्पा वानोळे,अजित पगारे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

नवख्या नगरसेवकांनी फक्त ऐकण्याचे काम केले
पालिकेत जवळपास सर्वच नगरसेवक नवखे असल्याने या अर्थसंकल्पावर चर्चा न करता तो मंजूर करण्यात आला. यात नवख्या नगरसेवकांनी फक्त पाहण्याची व ऐकण्याची भूमिका घेतल्याचे दिसले.

पहिल्यांदाच एक चांगला अर्थसंकल्प  
नगर परिषदेने पहिल्यांदाच एक चांगला अर्थसंकल्प सादर केला असून शहरातील मूलभूत सुविधांवर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.
- सूरज लोळगे, नगराध्यक्ष, पैठण.
बातम्या आणखी आहेत...